"सुवेंदू अधिकारींच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब; उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत 'या' नावांची चर्चा!"
पाच राज्यांतील निवडणुकांसोबतच पश्चिम बंगालमध्ये देखील 293 जागांसाठी निवडणूक आणि निकाल जाहीर झाले.
त्यामध्ये संपूर्ण चित्र एखाद्या थरारक चित्रपटाच्या क्लायमॅक्ससारखे वाटत होतंकधी भाजपची भगवा लाट आघाडी घेताना दिसली तर कधी ममता बॅनर्जी यांचा खेळा पुन्हा त्यांना शर्यतीत पुढे आणताना दिसला मात्र बंगालमध्ये भाजपचाच विजय झाला आहे. त्यामुळे आता भाजपमधील मुख्यमंत्रीपदासाठीच्या नावांची चर्चा झाली. त्यात पश्चिम बंगालमधील भाजपचे फायर ब्रँड नेते सुवेंदू अधिकारी यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र आता यामध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी काही नावांची चर्चा सुरू झाली आहे.
आज होणार मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा
पश्चिम बंगाल निवडणुकांदरम्यानच अमित शाह यांनी स्पष्ट केले होते की, राज्याचा मुख्यमंत्री हा बंगालमधीलच, बंगाली भाषा बोलणारा आणि बंगालच्या मातीतला सुपुत्र असेल. त्यामुळे अनेक नावांची चर्चा सुरू असली तरी शुभेंदू अधिकारी यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. अमित शाह निरीक्षक म्हणून तर मोहन चरण माझी सह-निरीक्षक म्हणून कोलकात्यात दाखल झाले आहेत. दुपारी भाजप आमदार दलाची बैठक होणार असून त्यानंतर काही वेळातच उपमुख्यमंत्रीपदाच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी शुभेंदू अधिकारी यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. यावेळी राज्यात दोन उपमुख्यमंत्री नेमले जाऊ शकतात, अशीही चर्चा आहे. त्यापैकी एक महिला उपमुख्यमंत्री असू शकते आणि त्यासाठी अग्निमित्रा पॉल यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. दुसरे उपमुख्यमंत्री उत्तर बंगालमधून असू शकतात, ज्यासाठी निशीथ प्रमाणिक यांचे नाव चर्चेत आहे. याशिवाय, आदिवासी समाजातील एका नेत्यालाही उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, या सर्व नावांबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
भाजपचा 'सीएम + दोन डिप्टी सीएम' फॉर्म्युला?
गेल्या काही महिन्यांत ज्या-ज्या राज्यांत भाजपची सत्ता आली, तिथे मुख्यमंत्रीसोबत दोन उपमुख्यमंत्री नेमण्याचा फॉर्म्युला पक्षाने वापरला आहे. 2023 मध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान, तर 2024 मध्ये महाराष्ट्र आणि 2025 मध्ये बिहारमध्येही भाजपने हाच प्रयोग केला होता. आता पश्चिम बंगालमध्येही भाजप हाच फॉर्म्युला राबवू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बंगालची गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती पाहता अमित शाह आणि मोहन चरण माझी हे एकाच वेळी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांची नावे जाहीर करू शकतात, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. मात्र, अंतिम निर्णय आमदार दलाच्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
दोन उपमुख्यमंत्री झाल्यास या नावांची चर्चा
जर शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री झाले, तर त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड होणार, याची उत्सुकता वाढली आहे. महिला उपमुख्यमंत्री म्हणूनही काही नावांची जोरदार चर्चा आहे. दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, रूपा गांगुली आणि समीक भट्टाचार्य ही प्रमुख नावे सध्या चर्चेत आहेत.
दिलीप घोष
दिलीप घोष हे पश्चिम बंगाल भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. 2021 विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष बनला होता. त्या निवडणुकीत भाजपने 77 जागा जिंकल्या होत्या. यावेळी दिलीप घोष यांनी खडगपूर सदर मतदारसंघातून टीएमसीचे प्रदीप सरकार यांचा तब्बल 30 हजार मतांनी पराभव केला.
अग्निमित्रा पॉल
शुभेंदू अधिकारी यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी ज्यांची सर्वाधिक चर्चा आहे, त्या म्हणजे अग्निमित्रा पॉल. शुभेंदू अधिकारी मुख्यमंत्री झाल्यास अग्निमित्रा पॉल यांना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते. व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेल्या अग्निमित्रा पॉल या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. आसनसोल दक्षिण मतदारसंघातून विजयी झालेल्या अग्निमित्रा या संभाव्य उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे मानले जात आहे.
रूपा गांगुली
'महाभारत' मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेल्या रूपा गांगुली अनेक वर्षांपासून भाजपशी जोडलेल्या आहेत. यावेळी त्यांनी सोनारपूर दक्षिण मतदारसंघातून टीएमसीच्या अरुंधती मैत्रा यांचा 35 हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे त्यांनाही उपमुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार मानले जात आहे.
समीक भट्टाचार्य
पश्चिम बंगाल भाजपचे विद्यमान अध्यक्ष समीक भट्टाचार्य हेही उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांनी यावेळी निवडणूक लढवली नव्हती. मात्र, शुभेंदू अधिकारी भवानीपूर मतदारसंघ स्वतःकडे ठेवून नंदीग्रामची जागा रिकामी करू शकतात. अशा परिस्थितीत समीक भट्टाचार्य यांना त्या जागेवरून निवडणूक लढवून उपमुख्यमंत्री होण्याची संधी मिळू शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.