'अम्मा कॅन्टीन'बाबत मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय; म्हणाले, "असा निर्णय घेणे सोपी गोष्ट नव्हती..."
चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी विजय जोसेफ यांनी आता अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर विजय यांनी एका पाठोपाठ एक मोठे निर्णय घेण्यास सुरूवात केली. आता त्यांनी थेट एआयएडीएमके सरकारच्या कार्यकाळातील योजनेला हात घातला आहे.
मुख्यमंत्री विजय यांनी सोमवारी राज्यातील 'अम्मा कॅन्टीन' अर्थात 'उणवगम' योजनांचे आधुनिकीकरण आणि संपूर्ण पुनर्बांधणी करण्याचे आदेश दिले. 2011 ते 2016 दरम्यान जयललीता यांच्या नेतृत्वाखालील एआयएडीएमके सरकारच्या कार्यकाळात ही योजना सुरू करण्यात आली होती.
24 फेब्रुवारी 2013 रोजी जयललिता यांच्या वाढदिवशी या कॅन्टीनची सुरुवात करण्यात आली होती. जयललिता यांना त्यांचे समर्थक आणि पक्षकार्यकर्ते प्रेमाने अम्मा असे संबोधत असत. सुरुवातीला चेन्नईमध्ये सुरू झालेली ही योजना नंतर राज्यातील विविध शहरांमध्ये आणि नगरांमध्ये विस्तारण्यात आली. अत्यंत कमी दरात सर्वसामान्यांना जेवण उपलब्ध करून देणाऱ्या या कॅन्टीनला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
2021 मध्ये एआयएडीएमकेचा प्रतिस्पर्धी पक्ष डीएमके सत्तेत आल्यानंतर ही योजना बंद किंवा कमकुवत करण्याऐवजी नव्या सरकारने ती आणखी विस्तारण्याचा निर्णय घेतला. डीएमके सरकारने अर्धशहरी भागांमध्ये टप्प्याटप्प्याने आणखी 200 अम्मा कॅन्टीन सुरू करण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे सरकारने या योजनेचे नावही बदलले नाही.मुख्यमंत्री विजय यांनीही ही परंपरा कायम ठेवत अम्मा कॅन्टीनची इमारती, सुविधा आणि पायाभूत व्यवस्था सुधारण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच नागरिकांना चविष्ट आणि दर्जेदार अन्न मिळेल याची खात्री करण्यास सांगितले आहे.अम्मा कॅन्टीनमधील अन्नाची गुणवत्ता आणि चव समाधानकारक नसल्याच्या तक्रारी मुख्यमंत्री विजय यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी कॅन्टीनमधील सुविधा आणि पायाभूत व्यवस्था सुधारण्याचे आदेश दिले.
सरकारी निवेदनानुसार अधिक स्वयंपाकाची भांडी आणि आधुनिक उपकरणांची खरेदी करून अन्नाची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या दर्जाचे आणि स्वादिष्ट अन्न उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनच्या अखत्यारीत 383 अम्मा कॅन्टीन कार्यरत आहेत तर राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखरेखीखाली आणखी 237 कॅन्टीन सुरू आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.