Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"पावसाळ्यापूर्वी सांगली तुंबण्याची भीती; रखडलेल्या नालेसफाईवरून मंगेश चव्हाणांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघाती निशाणा!"

"पावसाळ्यापूर्वी सांगली तुंबण्याची भीती; रखडलेल्या नालेसफाईवरून मंगेश चव्हाणांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघाती निशाणा!"


सांगली : मान्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे अत्यंत ढेपाळलेल्या आणि रखडलेल्या अवस्थेत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात शहरात पाणी साचून नागरिकांचे अतोनात नुकसान होते, तरीही महापालिका प्रशासनाने यातून कोणताही धडा घेतलेला नाही. या रखडलेल्या नालेसफाईमुळे सांगलीकरांमध्ये तीव्र संताप उसळला असून, यावरून  काँग्रेसचे नेते मंगेश चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि प्रशासनावर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.

​नालेसफाई फक्त कागदावरच? नागरिकांचा सवाल
​शहरातील मुख्य मोठे नाले आणि उपनाले अद्यापही कचरा, प्लास्टिक आणि गाळाने चोकअप आहेत. अनेक प्रभागांमध्ये अद्याप सफाई कर्मचाऱ्यांचे पायही लागलेले नाहीत. "प्रशासनाने नालेसफाईसाठी नेमका किती निधी मंजूर केला आणि प्रत्यक्षात किती टक्के काम झाले?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. पावसाचा पहिला मोठा सुळका आल्यास संपूर्ण शहर जलमय होण्याची आणि लोकांच्या घरात घाणेरडे पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.
​मंगेश चव्हाण यांचा सत्ताधाऱ्यांवर थेट प्रहार

​या गंभीर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर नेते मंगेश चव्हाण यांनी सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. ​सत्ताधाऱ्यांवर तोफ डागताना मंगेश चव्हाण म्हणाले, "दरवर्षी पावसाळा जवळ आला की नालेसफाईच्या नावाने केवळ फार्स (नाटक) केला जातो. कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी पाऊस सुरू होईपर्यंत कामे लांबवली जातात, जेणेकरून पुराच्या पाण्यात गाळ वाहून गेला असे सांगून बिले लाटता येतील. यंदाही तीच स्क्रिप्ट वापरली जात आहे. सत्ताधाऱ्यांना सांगलीकरांच्या जिवाची आणि मालमत्तेची कोणतीही पर्वा नाही." ते पुढे म्हणाले की, जर येत्या दोन-तीन दिवसांत युद्धपातळीवर नालेसफाई पूर्ण झाली नाही आणि पावसामुळे शहरात कुठेही पाणी तुंबले, तर नागरिकांना सोबत घेऊन महापालिकेवर तीव्र ठिय्या आंदोलन छेडले जाईल.

​प्रशासनाला शेवटचा इशारा
​शहरातील खणभाग, स्टेशन रोड, मिरजेतील सखल भाग आणि कुपवाडमधील औद्योगिक क्षेत्रातील नाल्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. वेळेत गाळ उपसला नाही तर महापालिकेच्या आरोग्य आणि नगरअभियंता विभागाला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे. मान्सूनपूर्व कामांमधील हा ढिसाळपणा सांगलीकरांना महागात पडणार असून, सत्ताधारी यावर काय उत्तर देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.