मिरजेत पोलिसांचा थरारक छापा; ५० हजारांच्या गांजासह तस्कराच्या आवळल्या मुसक्या!:, महात्मा गांधी चौक पोलीसांची कारवाई
मिरज: सांगली जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थ तस्करांविरोधी पुकारलेल्या युद्धात मिरजेत मोठी सफलता मिळाली आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने कैकाडी गल्ली परिसरात 'सर्जिकल स्ट्राईक' करत ५० हजार रुपये किमतीचा २ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत एका संशयित तस्कराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, या धडक कारवाईमुळे शहरात खळबळ माजली आहे.
हद्दपार गुन्हेगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा घाला
सांगली जिल्ह्यातून हद्दपार असलेला सराईत गुन्हेगार हुसेन बाशा सय्यद याचे नातेवाईक मिरजेत गांजा विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी वेळ न घालवता कैकाडी गल्लीत सापळा रचला.यावेळी संशयित बाशा अलीहुसेन सय्यद (वय ५७) हा हुसेन बाशा सय्यद याच्या घराच्या पायरीजवळ प्लास्टिकची पिशवी घेऊन दबा धरून बसला होता. पोलिसांनी शिताफीने झडती घेतली असता, त्याच्याकडे विक्रीसाठी आणलेला २ किलो तयार गांजा सापडला.
कारवाईचा थोडक्यात तपशील:
जप्त मुद्देमाल: ५०,००० रुपये किमतीचा २ किलो हाय-क्वालिटी गांजा.
अटक आरोपी: बाशा अलीहुसेन सय्यद.
अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) कलम ८(क), २०(ब), २२(ब) नुसार गुन्हा दाखल.
तस्करांचे धाबे दणाणले!
ही धडक कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात सपोनि संदीप शिंदे, पोउपनि पूनम पाटील आणि डी.बी. पथकातील जांबाज अंमलदारांचा समावेश होता. "नशामुक्त समाजासाठी आमची ही मोहीम यापुढेही अशीच आक्रमकपणे सुरू राहील. नागरिकांनी कोणत्याही छुप्या विक्रीची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी," असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.