Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात खाकीला काळिमा! लाचेचा घास गळ्यात अडकला, तरीही तक्रारदाराचा लचका तोडला!

पुण्यात खाकीला काळिमा! लाचेचा घास गळ्यात अडकला, तरीही तक्रारदाराचा लचका तोडला!


कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस दलातीलच एका कर्मचाऱ्याने पैशांच्या हव्यासापोटी भ्रष्टाचाराची परिसीमा गाठल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. चेक बाऊन्स प्रकरणातील वॉरंट बजावू नये यासाठी लाखोंची मागणी करणाऱ्या कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल गणेश कसपटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. मात्र अटक कारवाईदरम्यान आरोपीने तक्रारदाराच्या छातीचाच चावा घेतल्याने या प्रकरणाने आणखी नाट्यमय वळण घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार हैदराबाद न्यायालयातून एका व्यावसायिकाविरोधात चेक बाऊन्स प्रकरणात नॉन-बेलेबल वॉरंट जारी झाले होते. हे वॉरंट बजावले जाणार नाही तसेच संबंधितावर कोणतीही कठोर कारवाई होऊ नये यासाठी कॉन्स्टेबल कसपटे याने संबंधित तक्रारदाराकडून आधीच तब्बल पाच लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.
एवढ्यावरच न थांबता त्याने आणखी अडीच लाख रुपयांची मागणी केली. अखेर चर्चेनंतर व्यवहार दीड लाख रुपयांवर निश्चित झाला. दरम्यान सततच्या पैशांच्या मागणीला कंटाळलेल्या तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. एसीबीने प्राथमिक पडताळणी करत तक्रार खरी असल्याचे निष्पन्न होताच सापळा रचला.

पुण्यातील बोट क्लब रोड परिसरात आरोपीला पैसे स्वीकारण्यासाठी बोलावण्यात आले. तक्रारदाराकडून दीड लाख रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने कसपटे याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक झालेल्या कारवाईने गोंधळलेल्या आरोपीने संतापाच्या भरात तक्रारदाराच्या छातीवर चावा घेतला. एवढेच नव्हे तर एसीबी अधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर अधिकाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. या झटापटीत काही एसीबी अधिकारी किरकोळ जखमी झाले असून तक्रारदारालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे पुणे पोलिस दलाची प्रतिमा पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतच भ्रष्टाचाराचे असे प्रकार समोर येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे कायद्याचा धाक दाखवत आधीच लाखो रुपये उकळल्यानंतरही आरोपीची पैशांची भूक कमी झाली नव्हती, ही बाब अधिक गंभीर मानली जात आहे. एसीबीने आरोपीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे इतरांकडून पैसे उकळले आहेत का याचाही तपास सुरू करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलिस दलातील भ्रष्ट प्रवृत्तींवर पुन्हा एकदा कठोर कारवाईची गरज अधोरेखित झाली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.