पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात इंधन, खाद्यतेल वापरताना काटकसर करावी, वाहनांचा वापर कमी करावा यासाठी आवाहन केले होते, मात्र भारतीय जनता पक्षाच्या आजपासून सुरू झालेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय निवासी प्रशिक्षण शिबिरात भाजपनेच हरताळ फासून चमचमीत मेन्यू, आमरसाची मेजवानी आणि वाहनांच्या ताफ्यासह हे शिबीर दणक्यात सुरू झाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्याच आठवड्यात इंधन, खाद्यतेल वापरताना काटकसर करावी, गरज असल्यासच इंधनाचा वापर करावा, खाद्यतेलाचा जपून वापर करावा, सोन्याची खरेदी करू नये असे आवाहन देशातील जनतेला केले होते. काहींनी याबाबत स्टंटबाजी करून कुणी इलेक्ट्रॉनिक गाडय़ा व कुणी दुचाकी वाहनावर जाऊन प्रसिद्धी करून घेतली. आज भारतीय जनता पक्षाने तर कहरच केला. नांदेड येथे पंडित दीनदयाल उपाध्याय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आजपासून दोन दिवस भाजपने आयोजन केले आहे.
शहरालगत असलेल्या पिंपळगाव महादेव येथील अनुसया गार्डनच्या बाजूला असलेल्या सेव्हन सीज रिसॉर्ट येथे या शिबिराला थाटात सुरुवात झाली. चटपटीत व्यंजने, सोबत आमरसाची मेजवानी, चटपटीत भाज्या, भरपूर सलाड यांचा समावेश असलेले शाही भोजन शिबिरार्थींसाठी ठेवण्यात आले. विशेष म्हणजे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगाच रांगा दिसून येत असल्याने इंधन बचतीला हरताळ फासण्यात आला. मोदींच्या आवाहनाला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच हरताळ फासल्याने याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या आमदार चित्रा वाघ यांनी याबाबत प्रतिक्रिया विचारली असता अद्यापपर्यंत मी जेवण केले नाही, जेवण केल्यानंतर याबाबत प्रतिक्रिया देईन, या आयोजनाबद्दल भाजपचे महानगराध्यक्ष अमर राजूरकरच सांगू शकतील, असे म्हणून काढता पाय घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.