Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बीडमध्ये लग्नात मृत्यूचं तांडव! फटाक्यांच्या भीषण स्फोटात दोन फोटोग्राफर गंभीर जखमी; कॅमेरेही खाक

बीडमध्ये लग्नात मृत्यूचं तांडव! फटाक्यांच्या भीषण स्फोटात दोन फोटोग्राफर गंभीर जखमी; कॅमेरेही खाक


बीड : शहरातील बार्शी रोडवरील एका मंगल कार्यालयात मंगळवारी (दि. २८) सायंकाळच्या सुमारास शाही विवाह सोहळा सुरू असताना फटाक्यांच्या स्फोटाने मोठी दुर्घटना घडली. विवाह विधी पार पडल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी केली जात असताना, दारूगोळा असलेला एक मोठा फटाका आकाशात जाण्याऐवजी जमिनीवरच फुटला.

या प्रचंड स्फोटात फोटोशूट करणारे दोन तरुण फोटोग्राफर गंभीररीत्या भाजले असून, त्यांचे कॅमेरेही जळून खाक झाले.

या भीषण अपघातात एका फोटोग्राफरचा चेहरा प्रचंड भाजला असून, त्याच्या एका डोळ्याला गंभीर जखम झाली आहे तर दुसऱ्या फोटोग्राफरच्या कानाचा पडदा फाटला आहे. यासोबतच त्यांचे दोन महागडे कॅमेरेही पूर्णपणे खराब झाले आहेत. जखमींना तातडीने बीड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.

१ मे रोजी लग्नाची गाठ; पण...
दुर्दैवाची बाब म्हणजे, जखमींपैकी एका फोटोग्राफरचा विवाह १ मे रोजी होणार आहे. ऐन लग्नाच्या तोंडावर ही दुर्घटना घडली. सद्य:स्थितीत त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याला केवळ लग्नाच्या विधीपुरतेच विवाहस्थळी आणले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

फटाके वाजवावेत की नाही?

फटाके वाजवणे हा आनंदाचा भाग मानला जातो; परंतु बीडमध्ये २८ एप्रिल रोजी लग्नाच्या आतषबाजीदरम्यान झालेली दुर्घटना पाहता, सण किंवा उत्सवाचा आनंद दुसऱ्याच्या जिवावर बेतणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण तसेच आगीच्या घटना आणि शारीरिक इजा टाळण्यासाठी मर्यादा पाळणे हिताचे ठरते. विशेषतः दाट वस्तीत किंवा गर्दीच्या ठिकाणी फटाके वाजवणे टाळावे.

काय काळजी घ्यायला हवी?
फटाके नेहमी खुल्या मैदानातच वाजवावेत; मंगल कार्यालयासारख्या बंदिस्त किंवा गर्दीच्या ठिकाणी आतषबाजी टाळावी. फटाका जमिनीवर फुटल्यास डोळे, कान आणि चेहऱ्याला गंभीर इजा होऊ शकते. लहान मुलांवर लक्ष ठेवावे आणि सुरक्षेसाठी पाणी, वाळू व प्रथमोपचार पेटी जवळ ठेवावी.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.