पेपरफुटीचा 'व्हायरस' थेट वर्गापर्यंत! पुण्यातून फिजिक्स शिक्षिका जेरबंद; तिसऱ्या 'मनिषा'चा पर्दाफाश!
पुणे : देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एका मास्टरमाईंड महिलेला पुण्यातून अटक करण्यात आली. फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक करणाऱ्या मनीषा संजय हवालदार नावाच्या महिलेला सीबीआयने अटक केली आहे.
या प्रकरणातील ही ११ वी अटक आहे. मनीषा हवालदार या महिलेने नीट परीक्षेतील भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक केले होते. तिच्याकडे सखोल चौकशी सुरू असून, काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. मनीषा हवालदार सध्या पुण्यातील सेठ हिरालाल सराफ प्रशाला येथे कार्यरत होती.
एनटीएने तिला पेपर प्रक्रियेसाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्त केले होते. ती भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत पोहोचू शकत होती. यापूर्वी अटक झालेल्या मनीषा मांढरेसोबत मिळून तिने भौतिकशास्त्राचे काही प्रश्न लीक केले होते. हे सर्व प्रश्न तपासण्यात आले आणि हेच लीक झालेले प्रश्न नीटच्या पेपरमध्ये आल्याचे आढळले.
महाराष्ट्रातून आतापर्यंत सात जण अटकेत
सीबीआयने महाराष्ट्रातून शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे यांच्यासह दुसऱ्या राज्यातून दिनेश बिवाल, मांगीलाल बिवाल, विकास बिवाल, यश यादव यांना अटक केली होती. यामध्ये मनीषा हवालदार ११ वी आरोपी ठरली आहे.
मनीषा हवालदारवर निलंबनाची कारवाई
मनीषा हवालदार हिला सीबीआयकडून अटक होताच, विद्या प्रसारिणी सभेच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेकडून तिला निलंबित करण्याचे आल्याचे पत्रक काढण्यात आले. तसेच ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ असल्याचेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
तिन्ही महिला आरोपींची नावे मनीषाच...
आतापर्यंत सीबीआयने अटक केलेल्या तिन्ही महिला आरोपींची नावे मनीषाच असल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. यापूर्वी ब्यूटीपार्लर चालवणारी मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आली. त्यानंतर मॉडर्न महाविद्यालयातील जीवशास्त्राची शिक्षिका मनीषा मांढरे हिला अटक करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी मनीषा हवालदार हिला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात सीबीआयने देशभरातील विविध ठिकाणी छापेमारी केली असून, अनेक महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट्स आणि मोबाइल फोन जप्त केले आहेत. जप्त साहित्याचे सविस्तर विश्लेषण सुरू आहे. तपासात प्रश्नपत्रिका लीक होण्याचा मूळ स्रोत समोर आला असून, लाखो रुपये घेऊन विद्यार्थ्यांना विशेष कोचिंग क्लासेसमध्ये प्रश्न पुरवणाऱ्या दलालांनाही ओळखून अटक करण्यात आली आहे.
लातुरात चार डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात
लातूर : सीबीआयने शुक्रवारी लातूर शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरूरेनंतर आणखी तीन डॉक्टरांची चौकशी केली. त्यामध्ये दोन आयुर्वेदिक तज्ज्ञ, तर एक बालरोग तज्ज्ञ आहे. या सर्वांचे प्रा. पी. व्ही. कुलकर्णी कनेक्शन असल्याचा संशय सीबीआयला आहे.पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणाचा तपास सुरू असताना अनेकजण तर्कवितर्क लावून चर्चाचर्वण करीत आहेत. डॉ. मनोज शिरूरेंचा मुलगा बारावीला नाही. मात्र, त्याने मुलासाठी पेपर मिळविला, अशी माहिती सांगितली जात होती, ज्यामध्ये तथ्य आढळले नाही. डॉ. शिरुरेंची पोलिसांनी चौकशी केली असली तरी अद्याप अटक नाही. तसेच सीबीआयने साक्षीदार बनविले, हेही अजून स्पष्ट नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.