Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

BREAKING: सोशल मीडिया बनलं रणांगण! ‘ऑगी’ आणि ‘कॉक्रोच’च्या व्हर्च्युअल पक्षांमध्ये युद्धाची ठिणगी!

BREAKING: सोशल मीडिया बनलं रणांगण! ‘ऑगी’ आणि ‘कॉक्रोच’च्या व्हर्च्युअल पक्षांमध्ये युद्धाची ठिणगी!


दोन राजकीय पक्षांची भांडणे लोकशाही व्यवस्था असलेल्या देशांना नवी नाहीत. भारतासारख्या देशात तर अनेक राजकीय पक्ष आहेत. पक्षांच्या आघाड्या, युती आहेत. त्यांच्यात हेवेदावे पाहायला मिळतात. पण आठवडाभरापूर्वी उगवलेल्या सोशल मीडियावरील व्हर्च्युअल पक्षातही आता स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. १६ मे रोजी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या टिप्पणीला उपरोधिक प्रत्युत्तर देण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचे अकाऊंट तयार करण्यात आले. त्यानंतर आता अशा नावाचे अनेक हँडल्स तयार केले जात आहेत. कॉक्रोच जनता पार्टीला उत्तर देण्यासाठी ऑगी जनता पार्टीचीही स्थापना झाली, असे म्हणायला हरकत नाही.

ऑगी शब्दाचा अर्थ काय?

इंग्रजीमधील ऑगी (Oggy) या शब्दाचा उगम लोकप्रिय कार्टून शो "ऑगी अँड द कॉक्रोचेस"मधील मुख्य पात्रावरून झाला. या मालिकेत निळ्या रंगाचा आणि शांत स्वभावाचे एक मांजर आहे. या मांजराचे नाव ऑगी असून त्याला सतत खात राहायला आणि टीव्ही पाहायला आवडते. मात्र तीन खोडकर झुरळे त्याला नेहमी त्रास देत. 
या शोचे निर्माते जीन-यव्हिस रायबॉड यांनी प्रसिद्ध रॉक स्टार इगी पॉप यांच्या नावावरून प्रेरित होत या मांजराचे नाव ऑगी ठेवले होते. अर्थात या शोमध्ये ऑगी आणि कॉक्रोच यांची लुटुपुटुची लढाई दाखवण्यात आली होती. जी आता व्हर्च्युअल पक्षाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या हेतूवर संशय व्यक्त करत ऑगी जनता पार्टीची स्थापना करण्यात आली आहे. सोशल मीडियावर दोन्ही पक्षांचे एकमेकांविरोधात मीम्स व्हायरल होत आहेत. इंटरनेटवरील त्यांचे फॉलोअर्सही मीम्स, विनोद आणि राजकीय उपरोधिक टिप्पण्यांची मजा घेत आहेत. ऑगी जनता पार्टीने कॉक्रोच पार्टीच्या हेतूवर आणि त्यांच्या जाहीरनाम्यावर शंका उपस्थित केली असून त्यावर टीका केली आहे.

ओजीपी विरुद्ध सीजेपी सामना

ऑगी जनता पार्टीने (ओजीपी) नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि आम आदमी पक्षाचे संबंध असल्याचा आरोप केला. अभिजीत दिपके यांचा आम आदमी पक्षाच्या सोशल मीडिया आणि निवडणूक प्रचाराच्या टीममध्ये सहभाग होता, असाही आरोप ओजीपीने केला आहे.
ऑगी जनता पार्टीबरोबरच सोशल मीडियावर हीट जनता पार्टीचीही सुरुवात करण्यात आली आहे. ओजीपीच्या या पोस्टमध्ये अभिजीत दिपके आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा एक फोटोही दाखवला गेला आहे. बॉस्टन विद्यापीठात जाण्यापूर्वी दिपके यांनी सिसोदियांचे आभार मानले होते.
दिपके यांनी हा फोटो २०२४ साली पोस्ट केला होता. ज्यात त्यांनी लिहिले होते, "तुमच्याबरोबर काम करताना तुम्ही जी काही संधी मला दिलीत, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. बॉस्टनसाठी तुमचे मार्गदर्शन घेऊन मी निघत आहे. मी दूर जात असलो तरी हे अंतर 'आप'बद्दल असलेली माझी वचनबद्धता कमी करणार नाही."

सर्व झुरळांना मारून टाका - ओजीपीचे ध्येय
ऑगी जनता पक्षाने आपला हेतू स्पष्टपणे जाहीर केला आहे. सर्व झुरळांना ठार करणे, हाच आपला मुख्य उद्देश असल्याचे ओजीपीने जाहीर केले आहे. ओजीपीच्या संकेतस्थळावरील संदेशानुसार, "कोणत्याही आकाराचा, कोणत्याही प्रजातीचा, कोणतेही झुरळ असो, तो ठार करणार", असा संदेश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

एवढेच नाही तर ओजीपी हँडलवर कॉक्रोच या नावाविरोधातही पोस्ट टाकण्यात आली आहे. "ज्या भूमीत तलवारीच्या धारेने इतिहास घडवला, त्या भूमीतील तरुण स्वतःला झुरळे म्हणवून घेत अभिमान बाळगत असतील तर ही खरोखरच अत्यंत भीषण बेरोजगारीची लक्षणे आहेत", असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दोन्हीकडून NEET चा विषय ऐरणीवर

ओजीपी आणि सीजीपी एकमेकांविरोधात असले तरी नीट पेपरफुटी प्रकरणात दोघांनीही एकसमान भूमिका घेतली आहे. दोघांनीही विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली. ओजीपीने आपल्या पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर टीका केली असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही आपल्या एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी एक कँम्पेन लाँच केल्याचे सांगितले.

कॉक्रोच विरोधात 'हिट (HIT) पार्टी
समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालणाऱ्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या विरोधात आता 'हिट (HIT) जनता पार्टी'देखील सक्रिय झाल्याचे चित्र आहे. मागील काही तासांत या पार्टीच्या पेजचे फॉलोअर्स झपाट्याने वाढत असून, कॉक्रोचला संपवण्यासाठी ही पार्टी स्थापन केल्याचा दावा केला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.