सांगली :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाकाखाली सध्या एका 'पॅरलल' यंत्रणेने धुमाकूळ घातला असून, या यंत्रणेचा म्होरक्या 'प्रवीण अण्णा' याच्या काळ्या कारभाराची चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे. १० ते १२ जणांची फौज सोबत घेऊन चालवल्या जाणाऱ्या या यंत्रणेमुळे शासनाच्या महसुलाचा तर चुना लागतोच आहे, पण खाकीच्या इभ्रतीचेही धिंडवडे निघत आहेत.
काय आहे ही 'पॅरलल' यंत्रणा?
मिळालेल्या माहितीनुसार, ही यंत्रणा एखाद्या गुप्तचर यंत्रणेसारखी कार्यरत असते. जेव्हा उत्पादन शुल्क विभागाची रेड पडणार असते, तेव्हा ही 'पॅरलल' सिस्टीम सक्रिय होते. संबंधित हॉटेल, धाबे, हातभट्टी आणि अवैध दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर रेड पडण्यापूर्वीच "ताबडतोब सगळं रिकामी करा, धाब्यावर रेड पडणार आहे" असा 'अलर्ट' प्रवीण अण्णाच्या माणसांकडून दिला जातो.
रेड 'नावाला', मलिदा 'खिशाला'!
प्रवीण अण्णाची ही यंत्रणा बातमी पोचवण्याचे काम करते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने अण्णाचा खेळ सुरू होतो. रेड पडण्याच्या भीतीने घाबरलेल्या धंदेवाल्यांकडून 'चलन' (हप्ता) गोळा करण्याची जबाबदारी अण्णा पार पाडतो.
हप्तेखोरीचे गणित: गोळा झालेला हा 'मलिदा' संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांपर्यंत त्यांच्या घरापर्यंत पोचवला जातो.
स्वतःची पोळी: या संपूर्ण व्यवहारात प्रवीण अण्णा स्वतःचेही मोठे आर्थिक हित साध्य करून घेत आपली पोळी भाजून घेत आहे.
कोण आहे या अण्णाचा राजकीय 'गॉडफादर'?
एका बाजूला शासन अवैध धंद्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देत असताना, दुसरीकडे उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादानेच ही समांतर यंत्रणा राजरोसपणे कशी सुरू आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. एका सामान्य माणसाची एवढी हिंमत कशी होऊ शकते की तो सरकारी छाप्यांची माहिती आधीच लीक करतो? यावरून प्रवीण अण्णाच्या मागे विभागातीलच कोणत्या तरी बड्या अधिकाऱ्याचा हात असल्याचा संशय बळावला आहे. "रेड नावाला आणि अर्थपूर्ण तडजोडीला प्राधान्य असाच काहीसा प्रकार सध्या सुरू आहे. या प्रवीण अण्णावर आणि त्याला खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की ही लूट अशीच सुरू राहणार?" प्रवीण आण्णाचा पॅरलल सिस्टीम मुळे कारवाई होत नसल्याने उत्पादन शुल्कचा महसूल घट होत चालली आहे.
क्रमश.....
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.