Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक: डॉक्टर आणि लॅबच्या निष्काळजीपणामुळे महिलेला 'एचआयव्ही'चे खोटे लेबल! सांगलीत डॉ. रमाकांत टेके आणि टेक्निशियनवर गुन्हा दाखल

धक्कादायक: डॉक्टर आणि लॅबच्या निष्काळजीपणामुळे महिलेला 'एचआयव्ही'चे खोटे लेबल! सांगलीत डॉ. रमाकांत टेके आणि टेक्निशियनवर गुन्हा दाखल


सांगली :- आरोग्य सेवेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना सांगलीत उघडकीस आली आहे. डोळे तपासणीसाठी आलेल्या एका निष्पाप महिलेला चक्क HIV पॉझिटिव्ह असल्याचा चुकीचा रिपोर्ट देऊन तिला मानसिक धक्क्यात लोटणाऱ्या डॉ. रमाकांत टेके आणि लॅब टेक्निशियन तंजना मोमीन यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील एक महिला १६ फेब्रुवारी रोजी डॉ. रमाकांत टेके यांच्या हॉस्पिटलमार्फत आयोजित नेत्र तपासणी शिबिरासाठी सांगलीत आली होती. शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात आलेल्या रक्त तपासणीत लॅबने या महिलेचा रिपोर्ट 'एचआयव्ही पॉझिटिव्ह' असल्याचा दिला. हा अहवाल पाहताच महिलेच्या आणि तिच्या नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली. या रिपोर्टमुळे डॉक्टरांनी तिचे ऑपरेशन करण्यासही नकार दिला.



खोट्या रिपोर्टचा पर्दाफाश:
धक्का बसलेल्या नातेवाईकांनी खात्री करण्यासाठी दुसऱ्या लॅबमध्ये तपासणी केली असता, त्या महिलेचा रिपोर्ट 'निगेटिव्ह' आला. एका चुकीच्या रिपोर्टमुळे त्या महिलेला जो प्रचंड मानसिक त्रास आणि सामाजिक नामुष्की सहन करावी लागली, त्याबद्दल नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला. 

महिलेने या गंभीर प्रकाराबाबत महापालिका आरोग्य विभागाकडे धाव घेतली. आरोग्य अधिकारी डॉ. सुचेता पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली. तपासणीत लॅबचा हलगर्जीपणा आणि बोगस कारभार समोर आल्यानंतर, डॉ. पवार यांच्या फिर्यादीवरून डॉ. रमाकांत टेके आणि टेक्निशियन तंजना मोमीन यांच्यावर रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ​"रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा बोगस पॅथॉलॉजी लॅब आणि पदवी नसलेल्या टेक्निशियनचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल."

— डॉ. सुचेता पवार, आरोग्य अधिकारी, महापालिका.
​तपासणीची चढाओढ की धंदा?

परजिल्ह्यातून कॅम्प लावून रुग्ण खेचून आणण्याच्या डॉक्टरांच्या चढाओढीमुळे रुग्णांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिपोर्टच्या या घोळामुळे समाजात चुकीचा संदेश जात असून, अशा 'बोगस' कारभारावर आता सांगलीकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विश्रामबाग पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.