भाजपा युवा मोर्चाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. युवा मोर्चाच्या संघटन विस्तार आणि बळकटीकरणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भेटीदरम्यान कृष्णराज महाडिक यांनी रावसाहेब पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक व विविध संस्थांमधील कार्याचा सविस्तर आढावा घेतला. समाजकारण आणि संघटन बांधणीत पाटील यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाचा महाडिक यांनी विशेष गौरव केला. तसेच आगामी काळात भाजपा युवा मोर्चाच्या बळकटीकरणासाठी त्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना रावसाहेब पाटील म्हणाले की, "कृष्णराज महाडिक यांच्यासारख्या धडाडीच्या युवा नेतृत्वाची युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे महाराष्ट्रातील, विशेषतः सांगली-कोल्हापूर परिसरातील युवा वर्गात भाजपाविषयी एक नवे चैतन्य आणि उत्साह निर्माण झाला आहे."
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार:
याच कार्यक्रमात शांतिनाथ कर्वे यांची भाजपा युवा मोर्चाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, भाजपा जैन प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख प्रशांत गोंडाजे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच प्रशांत माने यांची ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, भाजपा जैन प्रकोष्ठ सांगली जिल्हाध्यक्ष महावीर पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सागर पाटील, हर्षद पाटील यांच्यासह भाजपा जैन प्रकोष्ठाचे पदाधिकारी, भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.