Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री हवेत, अन्यथा स्वस्थ बसणार नाही"; बच्चू कडूंचा एल्गार

​"शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री हवेत, अन्यथा स्वस्थ बसणार नाही"; बच्चू कडूंचा एल्गार


अमरावती: माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून विधान परिषद सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रथमच त्यांचे अमरावतीत आगमन झाले. अमरावती शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आल्यानंतर चांदूर बाजार आणि परतवाडा येथेही त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना बच्चू कडू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार बच्चू कडूंनी व्यक्त केला.

जनतेने नाकारले म्हणून नेत्याकडे

बच्चू कडू म्हणाले, बच्चू कडू आजवर एकटाच लढत आला आहे. तुम्ही जर मला पराभूत केले नसते, तर हे बॅनर घ्यायची गरज भासली नसती. जनतेने पाडले म्हणून नेत्याला स्वीकारले आहे. अन् तेही एैऱ्या गैऱ्या नेत्याला स्वीकारलेले नाही, तर शब्दाला पक्के असलेल्या एकनाथ शिंदेंना आम्ही नेता मानले आहे. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा भगवा आम्ही खांद्यावर टाकला. पण, मुख्यमंत्री आम्हाला एकनाथ शिंदे पाहिजेत. रात्री दोन वाजता देखील दार उघडून उभे राहणारे एकनाथ शिंदे आहेत.

दिव्यांग मंत्रालय स्थापन केले
बच्चू कडू म्हणाले, माझ्या दिव्यांग बांधवांसाठी देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय निर्माण करणे, जे कुठल्याही मुख्यमंत्र्यांना शक्य झाले नाही, ते एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले. तो दिव्यांग कुठल्या जाती, धर्माचा आहे, हे पाहिले नाही, पण दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याची ताकद बच्चू कडूच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी दाखवली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला, त्यात मोठा वाटा एकनाथ शिंदे यांचा आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारे लोक आहोत. त्या निर्धारापासून कधीही मागे हटणार नाही. शेतकरी, शेमजूर आणि दिव्यांगांचे प्रश्न हे आमच्यासाठी अग्रक्रमावर आहेत.
आमचे वैर कुणाशीही नाही

बच्चू कडू यांनी यावेळी भाजपचे अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांचे नाव न घेता त्यांच्यावरही बोचरी टीका केली. बच्चू कडू म्हणाले, आम्हाला कुणाशीही वैर पत्करायचे नाही. फालतू लोकांसोबत आम्हाला भांडण करण्याचीही इच्छा नाही. आम्ही शेतकरी, शेमजूर, दिव्यांगांसाठी भांडणारे लोक आहोत. प्रवीण तायडे यांनी दोन दिवसांपुर्वी त्यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना बच्चू कडू यांच्याविषयी अपशब्द वापरले होते, त्यावर बच्चू कडू यांनी फारशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.