Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली बाजार समिती त्रिभाजन प्रकरण: हायकोर्टातील सुनावणी ९ जूनपर्यंत लांबणीवर

सांगली बाजार समिती त्रिभाजन प्रकरण: हायकोर्टातील सुनावणी ९ जूनपर्यंत लांबणीवर

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाच्या वादावर कोणताही निर्णय झाला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झालेल्या सुनावणीनंतर हे प्रकरण आता थेट ९ जूनपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

त्यामुळे बाजार समितीच्या भवितव्याबाबतची अनिश्चितता आणखी वाढली आहे. बरखास्त संचालक मंडळासह राजकीय वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या शुक्रवारच्या (ता. ८) सुनावणीत निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे माजी संचालक, व्यापारी, शेतकरी संघटना आणि राजकीय नेत्यांचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले होते. मात्र, न्यायालयाकडून कोणताही अंतिम आदेश न झाल्याने पुन्हा एकदा 'तारीख पे तारीख' अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

सांगली बाजार समितीचे कार्यक्षेत्र मिरज, जत आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्यांत आहे. मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यास स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार जत आणि कवठेमहांकाळ येथे स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

या निर्णयाला विरोध करत विविध ग्रामपंचायती, विकास सोसायट्या, शेतकरी संघटना, तसेच विद्यमान संचालक मंडळाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. दुसरीकडे, त्रिभाजनाच्या समर्थनार्थ 'सांगली चेंबर ऑफ कॉमर्स'नेही स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. आतापर्यंत न्यायालयात पाच वेळा सुनावणीसाठी तारखा पडल्या. त्यात लेखी, तसेच प्रत्यक्ष सुनावणीही झाली. यापूर्वी ग्रामपंचायती, विकास सोसायटी आणि शेतकरी संघटनांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडण्यात आली.
संचालक मंडळाच्या वकिलांनी त्रिभाजन प्रक्रियेला स्थगिती द्यावी आणि बाजार समितीचा कार्यभार पुन्हा संचालकांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने सरकारी वकिलांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. मात्र, सरकारी पक्षाने अधिक वेळ मागितल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

उन्हाळी सुट्ट्यांमुळे निकाल लांबणीवर

न्यायालयाला उद्यापासून सुट्या सुरू होत असल्याने आता या बहुचर्चित प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जूननंतर होणार आहे. त्यामुळे बाजार समितीच्या त्रिभाजनाचा निर्णय आणखी लांबणीवर पडला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.