प. बंगालच्या फाल्ता मतदारसंघात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; सर्व २८५ केंद्रांवर २१ मे रोजी फेरमतदान, २४ ला निकाल!

पश्चिम बंगालमधील फाल्टा विधानसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानादरम्यान 'लोकशाही प्रक्रियेची पायमल्ली' आणि 'गंभीर निवडणूक गुन्हे' घडल्याचे ताशेरे ओढत केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे.

आयोगाने या मतदारसंघातील सर्वच्या सर्व २८५ मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश दिले आहेत.

आयोगाने दिलेल्या माहितीनसुरा, 21 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत फेर मतदान होणार असून निकाल 24 मे रोजी जाहीर होईल. तर राज्यातील उर्वरित २९३ जागांची मतमोजणी नियोजित वेळापत्रकानुसार ४ मे रोजीच होणार आहे.

आयोगाची कठोर भूमिका –

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, “१४४-फाल्टा विधानसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात निवडणूक नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे. लोकशाही प्रक्रियेत अडथळा आणल्याचा विचार करून, आयोगाने सर्व २८५ केंद्रांवर (पूरक केंद्रांसह) नव्याने मतदान घेण्याचे निर्देश दिले आहेत.”

नेमका वाद काय?

२९ एप्रिल रोजी झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान भाजपने तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर भागातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम  मशीनवरील भाजपच्या बटणावर टेप लावण्यात आल्याचा दावा भाजपने केला होता.


हा भाग मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपने तक्रार केली होती की, मतदारांना त्यांचे मत नोंदवण्यापासून रोखण्यात आले.

राजकीय आरोप-प्रत्यारोप –

भाजपच्या दाव्यानुसार ईव्हीएममध्ये फेरफार करून मतदारांचा हक्क हिरावून घेण्यात आला. तर तृणमूल काँग्रेसने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पराभवाच्या भीतीने भाजपने हा खोटा कांगावा केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, आयपीएस अधिकारी अजय पाल शर्मा (सिंघम) यांच्या भूमिकेवरही तृणमूलने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, त्यांनी टीएमसी उमेदवाराला धमकावल्याचा आरोप केला आहे.

कारवाईचा बडगा –

फाल्टाच्या हासिमनगर परिसरात मतदारांना धमकावल्याप्रकरणी पंचायत प्रधान इस्रफिल चौकीदार यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन तृणमूल कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.