Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"आगामी काळात काय होणार?" शिरसाटांनी युतीबाबत टाकलेला 'बॉम्ब' अन् फडणवीसांचे सूचक उत्तर

​"आगामी काळात काय होणार?" शिरसाटांनी युतीबाबत टाकलेला 'बॉम्ब' अन् फडणवीसांचे सूचक उत्तर


राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपाने राजकारण तापलेलं असतानाच आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी महायुतीमधील राजकीय पक्ष करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शिंदे सेना आणि भाजपाची युती २०२९ ला तुटणार का?

याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. या संदर्भाने आज सामना वृत्तपत्रातील संपादकीयमध्ये मोठा दावा करण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे (शिंदे) मंत्री संजय शिरसाट यांनीही मोठं वक्तव्य केलं होतं.

‘आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना (शिंदे) स्वबळावर निवडणूक लढवू शकतात’, असं शिरसाट यांनी म्हटलं होतं. मंत्री शिरसाट यांच्या या वक्तव्याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. मात्र, यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट उत्तर देणं टाळलं. ‘शिवसेनेत बोलण्याचा अधिकार फक्त शिंदेंनाच आहे’, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मला असं वाटतं की शिवसेनेत (शिंदे) बोलण्याचा अधिकार केवळ एकनाथ शिंदे यांनाच आहे. त्यामुळे जर एकनाथ शिंदे यांनी याबाबत काही वक्तव्य केलं तर मला त्याबाबत तुम्ही (पत्रकारांनी) प्रश्न विचारले पाहिजेत. मात्र, तरी याबाबत तुम्हाला विचारायचं असेल तर आमच्या प्रवक्त्यांना विचारलं पाहिजे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सामना संपादकीयमध्ये काय दावा करण्यात आला होता?

"भाजपा भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार आहे. भाजपाची गाडी फुल झाली, चढायला जागा नाही. ही गाडी अजित पवारांचा पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात आहे. अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे आणि उद्या शिंदे यांचे आमदारही भाजपामध्ये जातील", असा उल्लेख सामनाच्या संपादकीय लेखात करण्यात आला आहे.

संजय शिरसाट यांनी काय म्हटलं होतं?

सामना संपादकीयमध्ये करण्यात आलेल्या दाव्याबाबत पत्रकारांनी मंत्री संजय शिरसाट यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "प्रत्येक राजकीय पक्ष आपली संघटना मजबूत करण्याच्या आणि निवडणुकांची तयारी करण्याचा प्रयत्न करत असतो. तसं करण्याचा त्यांना अधिकार आहे. मित्रपक्ष जर स्वतंत्रपणे निवडणूक लढवू इच्छित असतील तर त्यांना रोखणारी कोणतीही राजकीय व्यवस्था नाही”, असं शिरसाट म्हणाले.

‘राजकारणात कोणताही करार किंवा बाँड नसतो’

“भाजपा २०२९ ला स्वबळावर निवडणूक लढवू शकतो का? तर लढवू शकतो. हीच गोष्ट शिवसेना (शिंदे) पक्षालाही लागू होते. मित्रपक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवू नये, यासाठी राजकारणात कोणताही करार किंवा बाँड नसतो. भाजपा आणि शिवसेना (शिंदे) वेगळे होऊन अगदी एका जागेसाठीसुद्धा स्वतंत्रपणे निवडणुका लढवू शकतील”, असंही मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं.

२०१४ साली स्वबळावर निवडणूक लढविण्याचा प्रयोग

दरम्यान, भाजपा आणि शिवसेना (संयुक्त) यांनी यापूर्वी एकत्र आणि एकमेकांच्या विरोधात (स्वबळावर) निवडणूक लढवलेल्या आहेत. २०१४ साली विधानसभा निवडणुकीला काही दिवस उरले असताना दोन्ही पक्षांनी युती तुटल्याची घोषणा करत वेगवेगळी निवडणूक लढवली होती. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आघाडी तोडली होती. निकालानंतर भाजपा १२२, शिवेसना (संयुक्त) ६३, काँग्रेस ४२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४१ जागा निवडून आल्या होत्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.