"मृत्यूच्या दाढेतून धाव! डोक्यात खुपसलेला कोयता घेऊन तरुण स्वतःच पोहोचला हॉस्पिटलमध्ये; मुंबईतील थरार पाहून डॉक्टरही चक्रावले!"
मुंबई : मुंबईतील पालिकेच्या लो. टिळक सायन रुग्णालयात घडलेल्या एका धक्कादायक आणि तितक्याच संवेदनशील घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या प्रकाराने संपूर्ण शहरात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एका तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्र म्हणजे कोयता खुपसलेला असतानाही तो स्वतःच्या पायांवर चालत रुग्णालयात पोहोचताना दिसतो. गंभीर जखम असूनही तो शुद्धीत असल्याचे आणि मोबाईलचा वापर करत असल्याचे दृश्य अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने या तरुणावर अचानक जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, ही घटना सायन परिसरात किंवा त्याच्या आसपास घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी जखमी अवस्थेतही त्या तरुणाला रुग्णालायात आणले. रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण दाखल होताना पूर्ण शुद्धीत व कोणताही न्यूरोलॉजिकल दोष नव्हता.त्याला तातडीने ट्रॉमा आयसीयूमध्ये दाखल करून आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. रेडिओलॉजिकल तपासणीत डाव्या बाजूने घुसलेली सुरी सुमारे १.५ इंच मेंदूत गेल्याचे आढळले. न्यूरोसर्जन डॉ. बटुक दियोरा व भूलतज्ञ डॉ. श्वेता मंब्रे यांच्या नेतृत्वाखाली तातडीने शस्त्रक्रिया करून सुरी यशस्वीरित्या काढण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून रुग्ण सध्या शुद्धीत, स्थिर असून ट्रॉमा आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. 'हा २५-२६ वर्षांचा रुग्ण २ मे रोजी पोलिसांकडून रुग्णालयात आणण्यात आला होता. डोक्यातील शस्त्र इतर कोणीही रुग्णालयाने काढण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचा एक्सरे एमआरआय सारख्या आवश्यक तपासणीनंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सुदैवाने, शस्त्र मेंदूच्या अत्यंत महत्त्वाच्या भागापर्यंत पोहोचले नव्हते. अन्यथा परिणाम अधिक गंभीर झाले असते. सध्या रुग्ण स्थिर असून त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे लक्ष आहे,' अशी माहिती सायन रुग्णालय अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.