पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी इराण आणि अमेरिकेत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल संकटच्या अनुषंगाने देशातील शाळांना ऑनलाइन क्लासेस घेण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वीच पंतप्रधान मोदींनी जास्तीत जास्त कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचे आवाहन केलं होतं. त्यानंतर त्यांना इंधन बचतीच्या दृष्टीकोनातून केलेले दुसरे मोठे आवाहन आहे. शाळांसाठीच्या स्कूल बस आणि इतर वाहनांसाठी होणारा पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने हे आवाहन करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असलेल्या शाळांनी खरोखरच पंतप्रधानांच्या आवाहनला प्रतिसाद देऊन ऑनलाइन शाळा सुरु केल्यास जूनमध्ये वर्ग थेट कोरोना काळाप्रमाणे ऑनलाइन माध्यमातून वर्ग भरवले जातील आणि मुलांना शाळेत जाण्याची गरज लागणार नाही, असं सांगितलं जात आहे.
पेट्रोल-डिझेल कमीत कमी वापरा
गुजरातमधील सोमनाथ येथे सार्वजनिक भाषणामध्ये मोदींनी, इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं. "मी माझ्या देशातील प्रत्येक नागरिकाला आवाहन करतो की, त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी करावा. मेट्रोचा वापर करा, इलेक्ट्रिक बसेस आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक लाभ घ्या आणि 'कारपूलिंग'ला प्रोत्साहन द्या. ज्यांच्याकडे स्वतःची कार आहे, त्यांनी एकाच वाहनातून जास्तीत जास्त लोकांना सोबत घेऊन प्रवास करावा. डिजिटल तंत्रज्ञानाने आता अनेक गोष्टी इतक्या सुलभ केल्या आहेत की, या तंत्रज्ञानाची मदत आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या कार्यालयांमध्ये 'व्हर्च्युअल मीटिंग्ज' आणि 'वर्क फ्रॉम होम' (घरून काम करणे) याला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे," असं मोदी म्हणाले.
स्थानिक गोष्टींना प्राधान्य देण्याचं आवाहन
पुढे बोलताना, "सोन्याच्या आयातीवरही देशाचा मोठा निधी परदेशात खर्च होतो. त्यामुळे, माझ्या सर्व देशबांधवांना मी आग्रहाने विनंती करतो की, जोपर्यंत परिस्थिती पूर्ववत होत नाही, तोपर्यंत सोन्याची खरेदी काही काळासाठी पुढे ढकलावी. आजची खरी गरज ही आहे की, आपण 'व्होकल फॉर लोकल' (स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणे) या संकल्पनेचे एका लोकचळवळीत रूपांतर करावे. परदेशी वस्तूंऐवजी स्थानिक उत्पादनांचा स्वीकार करा. तुमच्या गावातील, तुमच्या शहरातील आणि तुमच्या देशातील उद्योजकांना सक्षम करा," असं मोदी म्हणाले.
शाळांबद्दल नेमकं काय म्हणाले मोदी?
एवढ्यावरच न थांबता पंतप्रधान मोदींनी, ज्याप्रमाणे कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण सुरू होते, त्याच धर्तीवर तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा एकदा ऑनलाइन किंवा हायब्रीड लर्निंगचा अवलंब करावा, असे म्हटले आहे. "मी काही शाळांनाही आग्रह करेल की त्यांनी ऑनलाइन क्लासेसच्या व्यवस्थेवर काम करावं. केवळ इंधनच नाही तर खाण्याच्या तेलावरही परदेशी चलन खर्च होतं. आपण थोडं संयम बाळगला आणि तेलाचा वापर कमी केला तर यामुळे देश आणि आपल्या आरोग्याला लाभ होईल," असं पंतप्रधान मोदी म्हणाले. शाळांनी काही काळासाठी ऑनलाइन क्लासेस घ्यावेत. सरकारी, खासगी आणि अनुदानित शाळा सर्वांना यात समाविष्ट. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवावे, असं आवाहन मोदींनी केलं आहे. शाळांच्या बस आणि इतर वाहनांमुळे होणारा इंधनाचा वापर कमी करण्यासाठी त्यांनी हा पर्याय सुचवला आहे.
परकीय चलनाचं ओझं कमी करावं
तेलंगणापाठोपाठ मोदींनी गुजरातमध्येही सार्वजनिक भाषणात देशाच्या अर्थव्यवस्थेवरील परकीय चलनाचे ओझे कमी करण्यासाठी नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर छोटे बदल करावेत, याकडे विशेष लक्ष वेधल्याचं पाहायला मिळालं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.