Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​पुणे हादरले! पिंपरी-चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा धुमाकूळ; मॉलवर गोळीबार करत दिली थेट जीवे मारण्याची धमकी. "हा फक्त ट्रेलर..."

​पुणे हादरले!  पिंपरी-चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा धुमाकूळ; मॉलवर गोळीबार करत दिली थेट जीवे मारण्याची धमकी. "हा फक्त ट्रेलर..."


पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी रात्री थरारक गोळीबाराची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शार्प शुटर्सनी थेट AJ फर्निचर मॉलवर गोळ्या झाडत व्यावसायिकाला उघड धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात वाढत चाललेल्या संघटित गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

शुक्रवारी रात्री सुमारे 9 वाजून 24 मिनिटांच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून AJ फर्निचर मॉलसमोर आले. काही क्षणातच त्यांनी हातातील रिव्हॉल्व्हरमधून मॉलच्या दिशेने अंदाजे पाच ते सहा राऊंड फायर केले. गोळ्या थेट मॉलच्या नेमप्लेट आणि काचांवर झाडण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबारानंतर दोन्ही हल्लेखोर वेगाने पसार झाले, असे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांसह गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करत फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे गोळा केले. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये दुचाकीवरून आलेले दोन आरोपी गोळीबार करताना स्पष्ट दिसत असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य म्हणून ओळखला जाणारा शुभम लोणकर याने फेसबुक पोस्टद्वारे स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये AJ फर्निचर मॉलचे मालक अशोक नैन यांच्यावर गंभीर आरोप करत "हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी थेट डोक्यात असेल," अशी थेट धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

याचप्रकरणी आता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आरजू बिष्णोई यांच्या नावाने एक कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. "जो आमच्या विरोधात जाईल, त्याची आणि आमची लवकरच भेट होईल," असा इशारा या ऑडिओमध्ये देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ही ऑडिओ क्लिप खरोखरच बिश्नोई गँगशी संबंधित आहे का, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या धक्कादायक घटनेमुळे पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिश्नोई गँग महाराष्ट्रात आपले जाळे विस्तारत असल्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.