Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​'डिजिटल अरेस्ट' करून ५१ लाखांची फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी सांगली सायबर पोलिसांच्या जाळ्यात!

​'डिजिटल अरेस्ट' करून ५१ लाखांची फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी सांगली सायबर पोलिसांच्या जाळ्यात!


सांगली :-केंद्रीय तपास यंत्रणेचे (CBI) अधिकारी असल्याचे भासवून, तसेच सुप्रीम कोर्ट, रिझर्व्ह बँक आणि इन्कम टॅक्स विभागाचे खोटे लेटरहेड दाखवून एका सेवानिवृत्त वृद्धाला 'डिजिटल अरेस्ट'ची भीती घालत ५१ लाख ९ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा सांगली सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे दोन अट्टल आरोपींना पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत.

​काय आहे नेमकी घटना?

​तासगाव तालुक्यातील सावळज येथील रहिवासी अण्णासाहेब बाळगोंडा पाटील (वय ६१, व्यवसाय- सेवानिवृत्त) यांना जानेवारी २०२६ मध्ये आरोपींनी मोबाईलवर संपर्क साधला. आरोपींनी आपल्या व्हॉट्सॲप प्रोफाईलवर पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो लावले होते. त्यांनी आपण सीबीआय आणि केंद्रीय तपास यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याचे भासवत पाटील यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप केले.
​विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल केला, तसेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट, इन्कम टॅक्स आणि रिझर्व्ह बँकेच्या नावाचे बनावट लेटर्स पाठवून त्यांना अटकेची तीव्र भीती दाखवली. या मानसिक दबावाखाली आणून आरोपींनी ८ जानेवारी ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत पाटील यांच्याकडून तब्बल ५१ लाख ०९ हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने हा तपास सांगली सायबर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

​पुण्यातून दोन आरोपी गजाआड

​सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तांत्रिक तपास केला. फिर्यादी पाटील यांच्या खात्यातून फसवणूक झालेली रक्कमेपैकी २९ लाख ६० हजार रुपयांची रक्कम ज्या बँक खात्यांवर जमा झाली होती, त्याचा माग काढत पोलिसांनी पुण्यातून दोन आरोपींना अटक केली.

​अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१) अबू हुसेन समसुल आलम (वय ३८, रा. हडपसर, पुणे; मूळ रा. मुरशिदाबाद, पश्चिम बंगाल)
२) सुशील अकील राम (वय ३४, रा. मगरपट्टा सिटी, पुणे; मूळ रा. पश्चिम बंगाल)

​मोठा मुद्देमाल जप्त

​अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घराची झडती घेतली असता, सायबर पोलिसांना सायबर गुन्ह्यांसाठी वापरले जाणारे मोठे साहित्य मिळून आले. यामध्ये:
​४ महागडे मोबाईल फोन
​विविध बँकांचे एकूण १८ डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स
​२४ चेक बुक्स आणि ६ पासबुक्स
​६ ॲक्टिव्ह सिम कार्ड्स
​ओळखपत्रे व इतर बनावट कागदपत्रे
​ही धडक कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे तसेच पोलीस अंमलदार सतिश आलदर, करण परदेशी, रेखा कोळी, रुपाली पवार, सलमा इनामदार, कॅप्टन गुंडवाढ, विजय पाटणकर, अजय बेंद्रे, विवेक साळुंखे, अजय पाटील, अभिजित पाटील, इम्रान महालकरी, शातव्वा कोळी आणि दिपाली नेटके यांच्या पथकाने केली आहे. या आंतरराज्यीय टोळीने आणखी किती जणांना फसवले आहे, याचा पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.

​सांगली सायबर पोलिसांचे आवाहन:
​"कोणतीही सरकारी यंत्रणा, पोलीस किंवा सीबीआय फोन अथवा व्हिडिओ कॉल करून कोणालाही 'डिजिटल अरेस्ट' करत नाही किंवा पैशांची मागणी करत नाही. असा कोणताही फोन आल्यास घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधावा."

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.