Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विद्येच्या अंगणात यशाचा आनंद, पण घराच्या उंबरठ्यावर गुरुजींनी घेतला निरोप; महाराष्ट्र हळहळला

विद्येच्या अंगणात यशाचा आनंद, पण घराच्या उंबरठ्यावर गुरुजींनी घेतला निरोप; महाराष्ट्र हळहळला


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन सत्कार करण्याची परंपरा जपताना एका सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला. ही हृदय हेलावणारी घटना बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी घडली. विनायक महादेव काळे (वय ६०, रा. तुकडोजी चौक, विसापूर) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन सत्कार करण्यात येत होता. याच पार्श्वभूमीवर शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत दोंतुलवार, सेवानिवृत्त शिक्षक विनायक काळे तसेच अन्य शिक्षक सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी भेट देत होते. दरम्यान, शाळेतून दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणारी विद्यार्थिनी लावण्या कैलास इंगोले हिच्या घरी जाऊन तिचा सत्कार करण्यात आला. 

सत्कार समारंभ सुरू असतानाच -विनायक काळे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना भोवळ येऊन ते खाली पडणार इतक्यात सहकारी शिक्षकांनी त्यांना सावरले. यानंतर विसापूर येथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र, दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली.

विनायक काळे हे काही दिवसांपूर्वीच श्री. चिंतामणी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. तरीदेखील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनाचा लाभ मिळावा यासाठी त्यांची मानधनावर सेवा सुरू ठेवण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक धडे दिले, त्यांच्याच गुणवत्तेचा गौरव करताना काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने संपूर्ण विसापूर गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी उमा, मुलगी सिद्धी व रिद्धी असा परिवार आहे. विनायक काळे हे धोबी, परिट, वरठी समाज मंडळाचे पदाधिकारी म्हणूनही कार्यरत होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.