"चाकणकर SIT च्या रडारवर! खरात प्रकरणावरून प्रश्नांचा भडीमार; महिला आयोगाच्या अध्यक्षांची पाचावर धारण!"
नाशिक : संपूर्ण देशभर चर्चिल्या गेलेल्या अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची नाशिकमध्ये विशेष पोलीस तपास पथकाद्वारे तब्बल साडेपाच ते सहा तास कसून चौकशी करण्यात आली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वत: चौकशी केली. यावेळी खरातशी असलेले संबंध आणि आर्थिक व्यवहारांबाबत रुपाली चाकणकरांना अनेक टोकदार प्रश्न विचारण्यात आले.
अशोक खरात याच्या नाशिकच्या मिरगावातील काळ्या कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. श्रीमंत भक्तांना भुलवून त्यांच्याकडून लाखो रूपये उकळून, शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करण्याचा कारनामे त्याने केले. त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. याच प्रकरणात खरात सोबत असलेल्या जवळीकतेमुळे चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून त्यांच्या एसआयटी चौकशीची मागणी होत होती. परंतु पुरावे मिळाल्यानंतरच चौकशी होईल, असे सांगितले जात होते. अखेर रविवारी चाकणकर यांना चौकशीसाठी एसआयटीकडून बोलविण्यात आले होते.
एसआयटीने रुपाली चाकणकर यांना कोणकोणते प्रश्न विचारले?
अशोक खरात यांच्याशी तुमची ओळख कशी झाली? या प्रश्नाने रुपाली चाकणकर यांच्या पोलीस चौकशीची सुरुवात झाल्याचे सूत्रांनी सांगितले. अशोक खरातसोबत तुमचे कौटुंबिक संबंध नेमके कधीपासून होते? शिवनिका संस्थानातील तुमची भूमिका काय होती? तुम्ही 'शिवनिका' संस्थानच्या सदस्य असताना, अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांची तुम्हाला कल्पना होती का? असे प्रश्न सुरुवातीच्या तासा-दोनतासांत चाकणकर यांना विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.त्यानंतर पूजा विधी आणि आर्थिक धागेदोऱ्यांसंदर्भात चाकणकर यांची कसून चौकशी करण्यात आली. अशोक खरातसोबत तुम्ही नेमक्या कोणत्या पूजा विधी केल्या होत्या? या पूजा विधींच्या माध्यमातून काही आर्थिक व्यवहार किंवा काही आर्थिक संबंध जोडले गेले होते का? अशोक खरात याच्यासोबतचे तुमचे फोटो आणि व्हिडिओ नेमके कोणत्या काळातील आणि कोणत्या कार्यक्रमातील आहेत? खरातने बांधलेल्या मंदिरात येणारी इतर राजकीय मंडळी कोणाच्या सांगण्यावरून येत होती? शिवनिका संस्थानच्या बैठकांमध्ये नेमके कोणते कामकाज चालत असे? असे चाकणकर यांना विचारण्यात आले दुसरीकडे चाकणकर यांच्या नावाने समता पतसंस्थेत झालेल्या व्यवहारांवर देखील त्यांना विचारण्यात आले. खरातशी संबंधित आर्थिक व्यवहार कोणकोणत्या बँक खात्यांमधून झाले, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
चौकशीनंतर चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया
प्रदीर्घ चौकशी संपवून बाहेर पडल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केल्याचे सांगितले. पोलिसांना तपासासाठी ज्या प्रश्नांची उत्तरे आवश्यक होती, ती सर्व उत्तरे मी दिली आहेत. तपासात मी पूर्णपणे सहकार्य केले असून माझी सर्व उत्तरे समर्पक आहेत. चौकशीचा सविस्तर अहवाल लवकरच समोर येईल. मी आता पुण्याला रवाना होत आहे, असे चाकणकर यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.