राज्यात घर किंवा फ्लॅट खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. महाराष्ट्र सरकार आता 'लँड टायटलिंग ॲक्ट' लागू करण्याच्या तयारीत असून, येत्या जुलैपासून या कायद्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे तुम्हाला प्रत्येक फ्लॅट आणि मालमत्तेला स्वतंत्र 'मालमत्ता कार्ड' मिळणार आहे. असा कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली.
सध्या ग्रामीण भागात जमिनीचा मालकी हक्क दाखवण्यासाठी सातबारा उतारा असतो, तर शहरात मालमत्ता पत्रक दिले जाते. मात्र, मोठ्या इमारतींमधील स्वतंत्र फ्लॅटसाठी कोणताही वेगळा सरकारी मालकी दस्तऐवज उपलब्ध नसतो. त्यामुळे फ्लॅट खरेदी-विक्री करताना अनेकदा गोंधळ, वाद किंवा फसवणुकीच्या घटना घडतात.
हे टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार आता 'व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड' सुरू करणार आहे. म्हणजेच प्रत्येक फ्लॅटसाठी स्वतंत्र सरकारी नोंद तयार होईल. या कार्डवर मालकाचे नाव, जागेचे क्षेत्रफळ, मालमत्तेचे स्थान, व्यवहारांची माहिती आणि बाजारमूल्य यासारखे तपशील असतील.फसणूक टळणारया व्यवस्थेमुळे मालमत्ता व्यवहार अधिक पारदर्शक होतील. नागरिक जगाच्या कुठल्याही भागात असले तरी त्यांना ऑनलाइन पद्धतीने मालमत्तेचे व्यवहार करणे सोपे होणार आहे. तसेच बनावट कागदपत्रे आणि फसवणूक रोखण्यासही मदत होणार आहे.
'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान'
सरकारने विद्यार्थ्यांसाठीही मोठा दिलासा दिला आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' अंतर्गत शैक्षणिक कागदपत्रांसाठी लागणारे स्टॅम्प पेपर बंद करण्यात आले आहेत. विविध दाखले आता मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. राज्यातील सुमारे ३० लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.