सांगली दर्पण Exclusive! : सांगली उत्पादन शुल्क विभागात 'रात्रीस खेळ चाले'; साहेब आणि दलालांच्या 'मलिदा' भेटीने प्रशासनाचे धिंडवडे!
सांगली :-राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्ट कारभाराचा चिखल आता साहेबांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे. सांगलीच्या विवेकानंद चौक परिसरातील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये काल रात्री जो 'नंगा नाच' पाहायला मिळाला, त्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. विभागाची प्रतिमा आधीच मलीन झालेली असताना, वादग्रस्त 'प्रवीण अण्णा' आणि एका 'बड्या साहेबांची' मध्यरात्री झालेली गुप्त भेट ही निव्वळ सदिच्छा भेट नसून, तो विभागाच्या अब्रूचा लिलाव असल्याची चर्चा आता जनमानसात सुरू झाली आहे.
मध्यरात्रीचा थरार: साहेब अन् अण्णांचे 'अर्थ'पूर्ण समीकरण!
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, काल रात्री उशिरापर्यंत एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निवासस्थानाबाहेर प्रवीण अण्णाची टू-व्हीलर तळ ठोकून होती. ऑफिसच्या वेळेत भेटण्याऐवजी मध्यरात्रीच्या काळोखात अधिकाऱ्याच्या घरी जाण्याची गरज काय? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ही भेट म्हणजे प्रशासकीय कामाचा भाग होता की, अवैध धंद्यांना अभय देणारी 'सुपारी' होती? याचे उत्तर सांगलीकर शोधत आहेत.
'ती' १० तारीख अन् मलिद्याचा हिशोब!
बाजारात चर्चा आहे की, १० तारीख जवळ आली की वसुलीचे आकडे जुळवण्यासाठी दलालांची पळापळ सुरू होते.
मॅनेजमेंटचा खेळ: विभागाची प्रतिमा सुधारण्याऐवजी ती मलीन करणाऱ्या बातम्या दाबण्यासाठी ही 'फिल्डिंग' लावली गेली का?
हफ्त्याची गणिते: वरिष्ठ स्तरावर जो 'मलिदा' पोहोचवायचा असतो, त्या हिशोबाची फाईल ओव्हरटाईम करून पूर्ण केली जात होती का?
गुप्त फाईल: मध्यरात्री नक्की कोणत्या फाईलवर स्वाक्षऱ्या झाल्या आणि कोणत्या भ्रष्ट व्यवहारावर शिक्कामोर्तब झाले, याचा पर्दाफाश होणे गरजेचे आहे.
प्रशासनाची लक्तरे वेशीवर!
एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 'भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रा'च्या घोषणा देत आहेत, तर दुसरीकडे सांगली उत्पादन शुल्क विभागात 'दलाल राज' सुरू असल्याचे चित्र आहे. साहेबांच्या बंगल्यात रात्रीच्या वेळी दलालांचा राबता असणे, हे पारदर्शक कारभाराच्या चिंध्या उडवणारे आहे.
"काय हा प्रकार? अधिकारी जनतेसाठी आहेत की दलालांच्या दावणीला बांधले गेले आहेत? रात्रीच्या अंधारात चालणारे हे 'मलिदा' पुराण सांगलीची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे."
आता कारवाई होणार की 'सेटलमेंट'?
या प्रकरणाने विभागाच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वरिष्ठ प्रशासन या 'अर्थ'पूर्ण भेटीची दखल घेणार की 'मलिदा' संस्कृतीच्या वरदहस्ताखाली हे प्रकरणही दाबले जाणार? आता केवळ खुर्च्या वाचवण्याचे प्रयत्न होणार की भ्रष्ट अधिकाऱ्यांचे मुखवटे फाडले जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सांगलीच्या जनतेचा सवाल: साहेब, रात्रीच्या त्या अंधारात नक्की काय शिजलं?
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.