Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धुळे रक्ताळले! पत्नीसमोर अपमान केल्याचा राग; शिरपुरात पोटच्या मुलानेच मुसळाने ठेचून केली आई-वडिलांची निर्घृण हत्या

धुळे रक्ताळले! पत्नीसमोर अपमान केल्याचा राग; शिरपुरात पोटच्या मुलानेच मुसळाने ठेचून केली आई-वडिलांची निर्घृण हत्या


धुळे:  जिल्ह्यातील शिरपूर शहरात आज (दि. १५) घडलेल्या दुहेरी हत्येच्या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पत्नीसमोर अपमानास्पद बोलल्याचा राग मनात धरून मुलानेच आई-वडिलांच्या डोक्यात मुसळाने वार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शिरपूर येथील महावीर सोसायटी परिसरात आज (दि. १५) दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात गंगा झिरीलाल महतो आणि रनजुदेवी गंगा महतो यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महतो कुटुंबातील एका मुलीचे लग्न नुकतेच पार पडले होते. लग्न समारंभ आटोपून आई-वडील गुरुवारीच घरी परतले होते अशी चर्चा घटनास्थळी ऐकायला मिळाली. त्यानंतर घरात काही कारणावरून वाद झाला. पत्नीसमोर आई-वडिलांनी अपमानास्पद बोलल्याचा राग चंदन गंगा महतो याच्या मनात होता. या वादाचे पर्यवसान संतापजनक घटनेत झाले. संतापाच्या भरात चंदन महतो याने घरातील मुसळ उचलून आई-वडिलांच्या डोक्यावर जोरदार वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आरडाओरडा ऐकून शेजारी व परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले.
संशयितास लोकांनी पकडले

हत्येनंतर संशयित चंदन महतो फरार होण्याच्या तयारीत होता. मात्र, सतर्क नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पंचनामा व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासांतच संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियासह विविध माध्यमांतून घटनेची चर्चा सुरू झाली असून शिरपूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाची पोलीस ठाण्यात अद्याप अधिकृत नोंद झालेली नसली तरी पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

क्षणांच्या संतापातून कुटुंब उद्ध्वस्त
कौटुंबिक वाद इतक्या टोकाला जाऊ शकतो का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही क्षणांच्या संतापातून घडलेल्या या घटनेने महतो कुटुंब उद्ध्वस्त झाले असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, काही तासांपूर्वीच कुटुंबात लग्नाचा आनंदाचा माहोल असताना अचानक घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

दरम्यान, पोलिसांनी संशयित चंदन गंगा महतो याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली असून घटनेमागील नेमके कारण, घरातील वादाचे स्वरूप आणि इतर बाबींचा तपास केला जात असल्याचे कळते. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याची प्रक्रियाही सुरू असून पोलिसांकडून लवकरच अधिकृत माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे. या घटनेची चर्चा संपूर्ण जिल्हाभर सुरू असून सामाजिक माध्यमांवरही नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.