मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना एक महिन्याची मुदतवाढ देणारा अध्यादेश जारी होण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने आज (27 मे) राज्यातील 32 कार्यकारी अभियंता आणि 198 उपविभागीय अभियंत्यांच्या बदल्या केल्या. अलीकडच्या काळात विभागात एकाचवेळी घाऊक प्रमाणात बदल्या होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अनेक वर्ष मुंबईत ठाण मांडून बसलेले अभियंता अधिकारी पुन्हा मुंबईतच बदली मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर मुंबई, अंधेरी विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन धात्रक यांची बदली ठाण्यात सार्वजिनक बांधकाम विभाग 2 च्या कार्यकारी अभियंतापदी झाली आहे. तर धात्रक यांच्या जागी विशेष प्रकल्प विभाग आरे गोरेगावच्या कार्यकारी अभियंता गुंजन दिघावकर यांची वर्णी लागली आहे. मुंबईतील एकात्मिक घटक विभागाचे कार्यकारी अभियंता भूषण फेगडे यांची बदली कार्यकारी अभियंता म्हणून विशेष प्रकल्प विभाग आरे गोरेगाव येथे झाली आहे. ठाणे क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता सत्यनारायण कांबळे यांची बदली महाड येथे करण्यात आली आहे.
विभागाने कार्यकारी अभियंत्यासह उप विभागीय अभियंत्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. त्यात विभागातंर्गत कार्यरत असलेल्या 17, अमरावती प्रादेशिक विभागातील 18, छत्रपती संभाजीनगर विभागातील 15, कोकण -1 विभागातील 27, कोकण-2 विभागातील 22, नाशिक विभागातील 25, पुणे विभागातील 35, संकल्पचित्र मंडळातील 11, पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालयातील 13, तर राष्ट्रीय महामार्ग विभागातील 13 उप विभागीय अभियंत्यांचा समावेश आहे.
जे. जे. रुग्णालय उपविभागासाठी स्पर्धा
दरम्यान, उपविभागीय अभियंता रणजित शिंगाडे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या रुग्णालय बांधकाम आणि दुरुस्ती उपविभाग, भायखळा येथे बदली मिळवण्यासाठी अभियंत्यांमध्ये जोरदार स्पर्धा आहे. या जागेसाठी अनेक जण इच्छुक असताना विभागाने त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.मुंबईतील रुग्णालय बांधकाम आणि दुरुस्ती उपविभाग आणि मध्य मुंबई उपविभाग या दोन जागा तूर्त रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.