Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

१६ कोटींची फसवणूक प्रकरण: BMC चे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल, हायप्रोफाईल गुन्ह्याने खळबळ!

१६ कोटींची फसवणूक प्रकरण: BMC चे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल, हायप्रोफाईल गुन्ह्याने खळबळ!


मुंबई : खारमधील व्यावसायिक निशीत पटेल यांना खंडणीकरिता मारहाण केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या महेश पाटील यांना 28 नोव्हेंबर 2025 रोजी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. महेश पाटलांवर झालेल्या आरोपांमुळे त्यावेळी मुंबई महापालिकेत खळबळ उडाली होती. त्यावेळी तत्कालीन महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि तत्कालीन पोलीस महासंचालकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत महेश पाटील यांच्यावर एक महिना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली होती. 
परंतु, पुन्हा एकदा कामावर रुजू झाल्यानंतर महेश पाटील यांची बीएमसीच्या के - साऊथ वॉर्डमध्ये वॉर्ड ऑफिसर (मुंबई महापालिका सहाय्यक आयुक्त) म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता पुन्हा महेश पाटील यांच्यावर फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहे. हे आरोप बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांनी केला आहे. हबीबा यांनी महेश पाटील यांच्यावर तब्बल 16 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला असून या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 
हबीबा जाफरी यांनी बुधवारी 13 मे रोजी रात्री 09.30 वाजताच्या सुमारास महेश पाटील यांच्यावर फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हबीबा यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी महेश पाटील यांच्या व्यतिरिक्त निशीत पटेल (2025 मध्ये ज्या व्यावसायिकाने पाटील यांच्यावर आरोप केला होता, तेच हे व्यावसायिक), रूपेश, सागर मेहता, देवेंद्र पडवळ आणि इतर लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणि त्यात गुंतलेली मोठी रक्कम लक्षात घेता, तपास आता मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा गुन्हा नोंद झाल्याची प्रत "आपलं महानगर"च्या हाती लागलेली आहे.


नेमके प्रकरण काय?

हबीबा जाफरी यांनी केलेल्या तक्रारीनुसार, मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्या सांगण्यावरून आणि आश्वासनांवरून त्यांनी एका पुनर्विकास प्रकल्पात मोठी रक्कम गुंतवली होती. परंतु, मोठी रक्कम गंतवणूक करून ही महेश पाटील यांनी हबीबा यांना ना घर दिले, ना त्यांची गुंतवणूक परत केली. ज्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी महेश पाटील आणि निशित पटेल यांच्या व्यतिरिक्त, रुपेश, सागर मेहता, देवेंद्र पडवळ आणि इतर सहभागी लोकांना सहआरोपी करत गुन्हे दाखल केले आहेत. प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, या आरोपींनी वांद्रे पश्चिम येथील पुनर्विकास प्रकल्पात मोठ्या नफ्याचे आश्वासन देऊन अनेक प्रतिष्ठित गुंतवणूकदारांना आमिष दाखवले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ जाफरी कुटुंबच नाही, तर निवृत्त पोलीस अधिकारी, बीएमसी अधिकारी, कलाकार आणि निवृत्त न्यायाधीश यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनीही या प्रकल्पात 50 लाख ते 20 कोटी रुपयांपर्यंतची मोठी रक्कम गुंतवली आहे. हबीबा जाफरी यांनी त्यांच्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, बीएमसी कार्यालयात गेल्यावर त्यांना या योजनेबद्दल पहिल्यांदा समजले. तिथे त्यांची महेश पाटील यांच्याशी भेट झाली, ज्यांनी त्यांना गुंतवणूक योजनेबद्दल माहिती दिली आणि गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. महेश पाटील यांनी निशित पटेल यांच्यामार्फत त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर गुंतवणूक करण्यासाठी दबाव टाकला.
हबीबा यांनी केलेल्या या दाव्यानुसार, आरोपींनी बनावट सरकारी नोंदणी कागदपत्रे तयार केली आणि ती खरी असल्याचे भासवून त्यांचे पती, जावेद जाफरी, नातेवाईक नावेद जाफरी, उस्मान खान, हॅपीनेस इन्व्हेस्टमेंट्स, लोंगी फर्नांडिस आणि शबाना फर्नांडिस यांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. तक्रारीनुसार, आरोपींनी चेक, रोख रक्कम, विदेशी चलन आणि महागड्या घड्याळांच्या स्वरूपात एकूण 16.24 कोटी रुपये गोळा केले आणि नंतर गुंतवणूकदारांची फसवणूक केली. परंतु, आता वर्षभराच्या आतच पुन्हा एकदा महेश पाटील यांचे नाव फसवणुकीच्या प्रकरणात समोर आल्याने त्यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.