Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे 'DCP'ना स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे आदेश; ६ महिने उलटूनही तपास रखडल्याचा आरोप

सांगलीच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे 'DCP'ना स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे आदेश; ६ महिने उलटूनही तपास रखडल्याचा आरोप


नवी दिल्ली :- दिल्लीतील प्रसिद्ध सेंट कोलंबस शाळेत शिकणाऱ्या १६ वर्षीय शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आता थेट पोलिसांना निर्देश दिले आहेत. घटना घडून ६ महिने उलटले तरी तपास रखडल्याचा आरोप करत मृत विद्यार्थ्याचे वडील प्रदीप पाटील यांनी न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांच्या खंडपीठासमोर महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन 'डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस, क्राईम-V' (DCP) यांना या प्रकरणाच्या तपासाची सद्यस्थिती दर्शवणारा स्टेटस रिपोर्ट स्वतःच्या सहीनिशी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

​मृत शौर्य पाटील हा मूळचा सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यातील रहिवासी होता. गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर रोजी शिक्षकाच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

​६ महिने उलटूनही तपास रखडल्याचा वकिलांचा आरोप
​याचिकाकर्ते प्रदीप पाटील यांच्या वतीने बाजू मांडताना वकील प्रीतिश सभरवाल यांनी न्यायालयात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला. "घटना घडून ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे, तरीही पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही ठोस किंवा अर्थपूर्ण चौकशी केलेली नाही," असा आरोप त्यांनी केला.

​साक्षीदार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि गोपनीयतेचा मुद्दा गंभीर
​सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी एका अत्यंत संवेदनशील बाबीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. शौर्यला झालेल्या मारहाणीचे मुख्य साक्षीदार हे त्याचेच वर्गमित्र आहेत. हे सर्व साक्षीदार अल्पवयीन असल्याने, 'विटनेस प्रोटेक्शन स्कीम २०१८' (Witness Protection Scheme, 2018) अंतर्गत त्यांची ओळख गुप्त ठेवणे आणि त्यांना सुरक्षा देणे आवश्यक होते. मात्र, पोलिसांनी अद्याप यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत, असा गंभीर आरोप वकिलांनी केला.

​न्यायालयाने मागवला थेट रिपोर्ट; २४ जुलैला पुढील सुनावणी
​सुनावणीदरम्यान न्यायालयाने कोर्टात हजर असलेल्या तपास अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) यांच्या नेतृत्वाखालील एका विशेष तपास पथकाद्वारे (SIT) केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

​सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर, न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांनी थेट निर्देश देत, क्राईम ब्रांचच्या DCP कडून स्टेटस रिपोर्ट मागवला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ जुलै २०२६ रोजी होणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.