Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दर्पण Exclusive! सांगली सिव्हिल हॉस्पिटल हादरले! त्या' 77' नंबरमध्ये गोरगरिबांच्या आजारपणाच्या बिलांवर १०% 'झिझिया कर' उकळणारा 'तो' बडा बोका कोण?

सांगली दर्पण Exclusive! सांगली सिव्हिल हॉस्पिटल हादरले! त्या' 77' नंबरमध्ये गोरगरिबांच्या आजारपणाच्या बिलांवर १०% 'झिझिया कर' उकळणारा 'तो' बडा बोका कोण?


​13 वर्षे ठाण मांडून आलिशान बंगला बांधणारा भ्रष्टाचारी पुन्हा त्याच 'कमाऊ' खुर्चीसाठी फिल्डिंग लावतोय; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे 'वरदहस्त' की लाभाचे वाटेकरी?

सांगली :- गोरगरीब रुग्ण आणि प्रामाणिक शासकीय कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती (Medical Reimbursement) बिलांवर थेट १० टक्क्यांचा दरोडा टाकणारा एक अत्यंत संतापजनक आणि काळाकुट्ट कारभार सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उघडकीस आला आहे. हॉस्पिटलमधील 'रूम नंबर ७७' मध्ये बिलांना मंजुरी देण्यासाठी थेट 'झिझिया कर' (लाच) वसूल केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 13 वर्षांपासून नियम धाब्यावर बसवून एकाच जागेवर प्रतिनियुक्तीवर ठाण मांडून बसलेल्या एका बड्या 'बोक्याने' सर्वसामान्यांच्या रक्ताचा पैसा शोषून कोट्यवधींचे हात धुवून घेतले आहेत. या भ्रष्टाचाराच्या काळ्या पैशातून या महाशयाने स्वतःचा आलिशान 'बंगला' उभा केल्याचा खळबळजनक आरोप आता उघडपणे होऊ लागला आहे.

​13 वर्षांची हुकूमशाही, दहशत आणि टक्केवारीचा मलिदा!

​मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, संबंधित कर्मचाऱ्याची मूळ नियुक्ती दुसरीकडे असतानाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीमुळे तो गेली 13 वर्षे याच टेबलला फेविकॉलसारखा चिकटून होता. कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या आजारपणाच्या बिलांमधून लाखो रुपयांची टक्केवारी गोळा करून या बोक्याने स्वतःचे 'उखळ पांढरे' केले आहे. बिलांवर सह्या करण्यासाठी अडवणूक करणे, सर्वसामान्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर 'डारडूर' करून (धमकावून) त्यांना मानसिक त्रासात टाकणे ही या बोक्याची पद्धत होती. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या भ्रष्ट अधिकाऱ्याची एवढी दहशत होती की, कोणीही उघडपणे बोलण्याचे धाडस करत नव्हते. अखेर, या पापाचा घडा भरला आणि या कथित भ्रष्टाचाराची तक्रार थेट अँटी करप्शन ब्युरो (ACB) पर्यंत पोहोचली. एसीबीचा ससेमिरा मागे लागण्याच्या भीतीने प्रशासनाला जाग आली आणि ३ महिन्यांपूर्वी त्याची येथून गच्छंती करून त्याला मूळ जागेवर धाडण्यात आले.

​खुर्ची सुटली, पण 'माया' सुटेना! मागच्या दाराने फोनाफोनी सुरूच

जागा सुटली तरी भ्रष्टाचाराची चटक सुटत नाही, याचाच प्रत्यय सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येत आहे. मूळ जागेवर हाकलून ३ महिने झाले, तरी या बोक्याचा डोळा अजूनही त्या ७७ नंबरच्या 'कमाऊ' टेबलावरच लागलेला आहे. अजूनही मागच्या दाराने फोनाफोनी करून, एजंट आणि मध्यस्थांमार्फत बिलांमधील टक्केवारी सेट करण्याचे कारनामे पडद्यामागून राजरोसपणे सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. "गोरगरिबांच्या आजारपणाच्या पैशांवर डोळा ठेवणारी ही कसली प्रवृत्ती? एसीबीने या बंगलेवाल्या बोक्याची मालमत्ता जप्त करून याला तातडीने गजाआड केले पाहिजे!"

— संतप्त कर्मचारी, सांगली सिव्हिल हॉस्पिटल
​लाज कशी वाटत नाही? पुन्हा त्याच टेबलवर येण्यासाठी फिल्डिंग!

​सर्वात संतापजनक आणि धक्कादायक बाब म्हणजे, एसीबीपर्यंत तक्रारी जाऊनही आणि एवढा मोठा गैरव्यवहार चव्हाट्यावर आलेला असतानाही, या बोक्याला पुन्हा त्याच 'दुभत्या' टेबलवर आणण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधीलच काही बड्या अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर्थिक संधान साधून पुन्हा बिल मंजुरीच्या टेबलचा ताबा मिळवण्याची जोरदार तयारी या बोक्याने सुरू केली आहे.
​येथे कळीचा प्रश्न असा उपस्थित होतो की:

​एवढा गंभीर आरोप असलेल्या भ्रष्टाचाऱ्याला पाठीशी घालणारे सिव्हिलमधील ते 'वरिष्ठ' अधिकारी कोण?

​या टक्केवारीच्या मलिद्यामध्ये त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही खिसे गरम होत होते का?

​लाचखोर कर्मचाऱ्याला पुन्हा तिथेच बसवून वरिष्ठ अधिकारी नेमके काय साध्य करू पाहत आहेत?

​आता थेट 'आरपारची' लढाई; तीव्र आंदोलनाचा इशारा!
गोरगरिबांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या अशा भ्रष्ट आणि निर्लज्ज प्रवृत्तीला पुन्हा त्याच जागेवर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांमधून आणि संघटनांमधून दिला जात आहे. आता तरी जिल्हा वैद्यकीय प्रमुखांना आणि शासनाला जाग येणार का? की वरिष्ठ अधिकारी या भ्रष्ट बोक्याला वाचवण्यासाठी स्वतःची कातडी वाचवणार? लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) या आलिशान बंगलेवाल्या लाचखोरावर आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांवर कधी बेड्या ठोकणार? याकडे आता संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.