सांगली दर्पण Exclusive! सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागात 'झिरो'ची दादागिरी; वरिष्ठांच्या आशीर्वादाने कर्मचाऱ्यांचा छळ, लाखांची उलाढाल करणारा 'प्रवीण अण्णा' नेमका कोण?
सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागात सध्या एका कथित 'झिरो'ची हुकूमशाही आणि मुजोरी पराकोटीला पोहोचली असून, प्रामाणिक कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांना या जाचाला सामोरे जावे लागत आहे. २०१६ मध्ये अवघ्या १५०० रुपयांच्या तुटपुंज्या मानधनावर 'एंट्री' मारणारा हा प्रवीण अण्णा आज थेट लाखांच्या घरात खेळत असून, स्वतःचे आलिशान ऑफिस थाटून बसला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच या महाभागाची मजल एवढी वाढली असल्याचा संताप आता व्यक्त होत आहे.
अवघ्या १० वर्षांत लाखांची माया!
मिळालेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये अत्यंत सामान्य परिस्थितीत विभागात आलेल्या प्रवीण अण्णाने अल्पावधीतच भ्रष्टाचाराची पाळेमुळे घट्ट केली. विभागातील अनेक मोठे आणि संशयास्पद 'प्रस्ताव' स्वतः तयार करून, ते वरिष्ठांच्या टेबलपर्यंत पोहोचवणे आणि त्या बदल्यात वरिष्ठांचे 'हात ओले' करून स्वतःची तुंबडी भरणे, हाच याचा मुख्य धंदा बनला आहे. याच आर्थिक गैरव्यवहाराच्या बळावर त्याने स्वतःचे साम्राज्य उभे केले आहे.
महिला कर्मचाऱ्यांचा अपमान; वरिष्ठ मूक गिळून गप्प!
पैशांच्या मदांधतेमुळे या प्रवीण अण्णाने कार्यालयातील महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना तुच्छ लेखण्यास सुरुवात केली आहे. अत्यंत उद्दामपणे महिला कर्मचाऱ्यांचा अपमान करण्यापर्यंत त्याची मजल गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या अपमानाची साधी दखल घेण्याचे सौजन्यही उत्पादन शुल्क विभागातील बड्या अधिकाऱ्यांनी दाखवलेले नाही. पिडित महिला कर्मचाऱ्यांची साधी विचारपूस करण्याची तसदी न घेता, वरिष्ठांनी या मुजोर प्रवृत्तीसमोर लोटांगण घालत 'मूक गिळणे' पसंत केले आहे.
...तर मग 'गॉडफादर' कोण?
एका खाजगी व्यक्तीची सरकारी कार्यालयात एवढी दहशत कशी असू शकते? कर्मचाऱ्यांचा जाहीर अपमान होऊनही वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर कारवाई का करत नाहीत? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाभाचा वाटा पोहोचवून गप्प ठेवणारा हा प्रवीण अण्णा नेमका कोणाच्या इशाऱ्यावर नाचत आहे आणि त्याचा खरा 'गॉडफादर' कोण, हे आता चव्हाट्यावर आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास कर्मचाऱ्यांमधून तीव्र आंदोलनाचा इशारा मिळण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.