बीड : राज्याच्या महसूल विभागात खळबळ उडवून देणाऱ्या ७३ कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात निर्णायक वळण आले आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेले बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पाठकांच्या अटकेनंतर आता तपासाची सुई एका महिलेसह आणखी तीन बड्या अधिकाऱ्यांकडे वळली असून, लवकरच या घोटाळ्यातील इतर 'बडे मासे' जेरबंद होण्याची शक्यता आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप झाला. जमिनीच्या वाढीव मोबदल्याच्या एकूण १५४ प्रकरणांमध्ये चक्क २४१ कोटी ६२ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. त्यापैकी ७२ ते ७३ कोटी रुपयांचा वाढीव मोबदला नियमबाह्यरीत्या वाटप करून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्वाक्षरीचा फॉरेन्सिक अहवाल आणि अटक
अविनाश पाठक हे २२ एप्रिल २०२५ रोजी बीडमधून कार्यमुक्त झाले होते. मात्र, त्यांच्या कार्यकाळानंतरही मागील तारखा वापरून बनावट आदेश काढले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सहायक पोलीस अधीक्षक एम. व्यंकटराम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा तांत्रिक तपास केला. तब्बल २,५०० कॉल रेकॉर्डिंग आणि पाठकांच्या स्वाक्षरीचा फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पोलिसांनी त्यांना लातूर येथून ताब्यात घेतले आणि शुक्रवारी रात्री त्यांना अटक केली.
तपासाची सुई आता 'त्या' तिघांकडे
अविनाश पाठक यांच्या अटकेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घोटाळ्यात एका बड्या महिलेसह आणखी तीन संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत. हे संशयित सध्या पोलिसांसमोर येण्याचे टाळत असून त्यांनी 'नॉट रिचेबल' राहण्याचा पवित्रा घेतला आहे. पोलीस सध्या या संशयितांविरुद्ध तांत्रिक पुरावे आणि महत्त्वाची कागदपत्रे गोळा करत आहेत.
न्यायालयाकडून १५ मे पर्यंत पोलीस कोठडी
शुक्रवारी न्यायाधीश एस. आर. शिंदे यांच्या न्यायालयासमोर अविनाश पाठक यांना हजर करण्यात आले. तपासाची व्याप्ती मोठी असल्याने न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.