मुंबई :-मुलींना 'चॉकलेट बॉय' नको, 'बॅड बॉय'च हवा! महिला PSI ने सांगितलं यामागचं 'सायकॉलॉजिकल' कारण
मुंबई : प्रत्येक पालक आपल्या मुलीसाठी एक सुंदर भविष्याचं स्वप्न पाहत असतो. चांगलं शिक्षण, उत्तम करिअर आणि समजूतदार जीवनसाथी मिळावा, अशी त्यांची इच्छा असते. मात्र अनेकदा वास्तव वेगळंच दिसून येतं.
चांगल्या कुटुंबातील, सुशिक्षित आणि हुशार मुली काही वेळा अशा मुलांकडे आकर्षित होतात ज्यांची प्रतिमा समाजात 'बॅड बॉय' किंवा टपोरी व्यक्ती म्हणून ओळखली जाते. अशावेळी अनेकांना प्रश्न पडतो की अरे ही मुलगी तर चांगली आहे, मग अशा मुलाच्या का प्रेमात पडली हिला तर कोणीही चांगला मुलगा मिळाला असता.
हा विषय अनेकदा चर्चेचा ठरतो. पण यामागे नेमकं काय मानसशास्त्र असतं? याविषयी महाराष्ट्र पोलीस दलातील महिला PSI मोसमी कटरे यांनी एका व्हायरल व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांचा हा व्हिडीओ जुना आहे, परंतू तो पुन्हा एकदा लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
आकर्षण प्रेमाचं नसून 'महत्त्व मिळण्याचं' असू शकतं
PSI कटरे यांच्या मते, अनेक वेळा मुलींना त्या मुलाच्या स्वभावापेक्षा त्याच्यासोबत मिळणाऱ्या विशेष वागणुकीचं आकर्षण वाटतं. अशा मुलांच्या मित्रमंडळीत एखाद्या मुलीला विशेष आदर दिला जातो. "भाभी", "वहिनी" किंवा "भाईची स्पेशल" अशा संबोधनांमुळे तिला स्वतःचं वेगळं स्थान असल्याची भावना निर्माण होते. काही वेळा हिच गोष्ट तिला भावनिकदृष्ट्या आकर्षित करू लागतं.
संरक्षणाची भावना की भ्रम?
अनेक मुलींना वाटतं की असा मुलगा त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणाशीही भिडू शकतो. कुणी त्रास दिला तर तो लगेच उभा राहील, अशी प्रतिमा त्यांच्या मनात तयार होते.
मात्र PSI कटरे यांच्या मते, ही भावना अनेकदा वास्तवापेक्षा वेगळी असते. एखादी व्यक्ती सतत भांडणं, दादागिरी किंवा नियम मोडण्याच्या गोष्टींमध्ये सहभागी असेल, तर ते धैर्याचं नव्हे तर चुकीच्या वर्तनाचं लक्षण असू शकतं.
चित्रपट आणि सोशल मीडियाचाही प्रभाव
आज अनेक चित्रपट, वेब सिरीज आणि सोशल मीडिया कंटेंटमध्ये 'बॅड बॉय' प्रतिमा आकर्षक दाखवली जाते. नियम मोडणारा, बिनधास्त वागणारा आणि कोणालाही न घाबरणारा मुलगा हा अनेकदा हिरोसारखा सादर केला जातो. यामुळे काही तरुणींना अशा स्वभावाकडे आकर्षण वाटू शकतं. पण वास्तवातील आयुष्य आणि मनोरंजनासाठी तयार केलेली कथा यामध्ये मोठा फरक असतो.
PSI कटरे सांगतात की अनेकदा मुली आत्मविश्वासाला आकर्षित होतात. पण काही वेळा आत्मविश्वास आणि आक्रमकपणा यामध्ये गोंधळ होतो. एखादी व्यक्ती मोठ्या आवाजात बोलते, इतरांना घाबरवते किंवा नियमांकडे दुर्लक्ष करते, याचा अर्थ ती मजबूत व्यक्तिमत्त्वाची आहे असे नाही. खरा आत्मविश्वास हा इतरांचा आदर करण्यात आणि जबाबदारीने वागण्यात दिसून येतो.
समाजात खरी किंमत कोणाची?
महिला PSI यांचा ठाम संदेश असा आहे की, समाजात खरी प्रतिष्ठा त्या व्यक्तीची असते जी प्रामाणिकपणे जगते, स्वतःच्या मेहनतीने यश मिळवते आणि इतरांचा सन्मान राखते. मित्रांचा गराडा किंवा खोटा रुबाब यामुळे एखादी व्यक्ती मोठी होत नाही. उलट अशा गोष्टींच्या मागे धावताना अनेकदा आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय चुकीचे ठरू शकतात.
पालक आणि मुलांमध्ये संवाद महत्त्वाचा
तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत सतत रागावण्यापेक्षा संवाद अधिक प्रभावी ठरतो. मुलांनी कोणत्या गोष्टीमुळे एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होतात हे समजून घेणे आणि योग्य-अयोग्य यातील फरक शांतपणे समजावून सांगणे गरजेचे आहे. कारण खरा हिरो तो नसतो जो लोकांना घाबरवतो; खरा हिरो तो असतो जो स्वतःच्या वागणुकीने इतरांचा विश्वास जिंकतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.