५० खासदारांचे पाठबळ असणाऱ्या 'इंडिया'त बिघाडी? बंगालमध्ये काँग्रेस-TMC आमनेसामने, तर तामिळनाडूत 'टीव्हीके'चा स्टॅलिनना सुरुंग.


2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीने भाजपला तगडा झटका दिला होता. जिथे भाजपचा नारा 400 पार होणार होता, त्याच ठिकाणी भाजपला त्यांनी 240 वरती आणून ठेवलं होतं. बहुमतासाठी भाजपला नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचा टेकू घ्यावा लागला. मात्र, त्यानंतर झालेल्या सर्वच विधानसभा निवडणुकीमध्ये अपवाद वगळता आपण इंडिया आघाडीला तगडा झटका बसला आहे. यामध्ये आता सर्वात मोठा धक्का ममता बॅनर्जी आणि एमके स्टॅलिन यांना बसला आहे.

इंडिया आघाडीमध्ये दोन्ही पक्षांचे मिळून 50 लोकसभा खासदार

आज (4 मे) पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निकालामध्ये ममतांचा 15 वर्षांचा किल्ला ढासळला आहे.त्यामुळे आता आपण मामता बॅनर्जी यांच्यासमोर भविष्यकाळामध्ये निवडून आलेले आमदार आणि खासदार सुद्धा सोबत ठेवण्याच्या आव्हान असेल. दुसरीकडे तमिळनाडूमध्ये सुद्धा डीएमकेचा बालेकिल्ला ढासळला आहे. या ठिकाणी विद्यमान मुख्यमंत्री स्टॅलिन आहेत. या दोन्ही पक्षांचे मिळून 50 लोकसभा खासदार इंडिया आघाडीमध्ये आहेत. मात्र, इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक मुद्द्यांवरून एकसंध राहिली नसल्याचे स्पष्टपणे दिसून आलं आहे. त्यामुळे इंडिया आघाडी फक्त नावापुरतीच राहणार की अजस्त्र भाजप आणि केंद्रीय यंत्रणांचा एकहाती मुकाबला करणार की नाही याचं उत्तर मिळणं बाकी आहे.

निवडणूक लढवण्यावरून काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमध्ये मतभेद
गेल्या काही दिवसांपासून प्रादेशिक मुद्द्यांवरून तसेच राज्यांमध्ये निवडणूक लढवण्यावरून काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमध्ये सातत्याने मतभेद निर्माण होत आहेत. बंगालमध्ये सुद्धा थेट ममता यांच्या विरोधात काँग्रेसने प्रचार केला. राहुल गांधी यांनी सुद्धा सभा घेतल्या. ममता सरकारवर आरोप केले. मात्र, काँग्रेसची डाळ सुद्धा शिजली नाही. मात्र, झालेल्या मतविभागणीमुळे ममता बॅनर्जी यांना दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने तगडा झटका ममता बॅनर्जी यांनाच बसला. एसआयआरमुळे बंगालमधील जवळपास 91 लाखांवर नावे कापली गेली आहेत.
ममता बॅनर्जी यांच्यासह स्टॅलिन यांची कसोटी

निवडणूक कोणतीही असूदे मतविभागणीचा फायदा जेव्हा जेव्हा या देशांमध्ये निवडणुका झाल्या आहेत तेव्हा भाजपाला झाला आहे. हा इतिहास ज्ञात असतानाही इंडिया आघाडीतील पक्षांनी कोणताच धडा घेतलेला नाही, हेच वारंवार सिद्ध होत आहे. दुसरीकडे तमिळनाडूमध्ये सुद्धा अशीच चिन्हे आहेत. डीएमकेला नाकारताना एआयडीएमके आणि टीव्हीकेला संधी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी पक्ष स्थापन केलेल्या थलापती विजय यांना तमिळ जनतेनं संधी दिली आहे. त्यामुळे आता तामिळनाडूमध्ये सुद्धा डीएमकेला विरोधात बसावं लागणार आहे. डीएमकेचे 22 लोकसभा खासदार असून टीएमसीचे 28 खासदार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांचे जवळपास 50 खासदार असूनही दोन्ही पक्षाला अपेक्षित यश प्राप्त झालेलं नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच पक्ष एकसंध ठेवण्याच्या दृष्टीने ममता बॅनर्जी यांच्यासह स्टॅलिन यांची कसोटी असणार आहे. आजघडीला जयललिता यांचा पक्ष तामिळनाडूमधील फक्त नावाला सोडला असून त्या पक्षावर पूर्णतः नियंत्रण भाजपचं आहे.

पक्ष सांभाळणे हीच मोठी लढाई
त्यामुळे येत्या काळामध्ये भाजप विरोधात लढताना आपले पक्ष सांभाळणे ही सुद्धा मोठी लढाई या माजी मुख्यमंत्र्यांवर असणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये ठाकरे गटाची आणि शरद पवार गटाचे झालेली स्थिती सर्वज्ञात आहे. इतकेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळूनही विधानसभेमध्ये मात्र धुळदाण उडाली. त्यानंतर सातत्याने महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये सुद्धा हाती काही लागलेलं नाही. त्यामुळे भाजपविरोधात मोहीम राबवणाऱ्या ममता बॅनर्जी यांना पराभव पत्करावा लागल्याने येत्या काळामध्ये भाजप विरोधात दोन हात करताना पक्ष सांभाळण्याची सुद्धा मोठी जबाबदारी असणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.