Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'रेड' सिनेमा प्रत्यक्ष उतरला जमिनीवर! TMC नेत्यानं शेतात गाडला २.२४ कोटींचा खजिना; पोलिसांनी कुदळ-फावड्याने खणून काढल्या नोटा!

'रेड' सिनेमा प्रत्यक्ष उतरला जमिनीवर! TMC नेत्यानं शेतात गाडला २.२४ कोटींचा खजिना; पोलिसांनी कुदळ-फावड्याने खणून काढल्या नोटा!


पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक दीपांकर भट्टाचार्य यांच्या अटकेनंतर त्यांच्या शेतातून मोठी रोख रक्कम आणि सोनं जप्त करण्यात आलं आहे. भट्टाचार्य यांना मंगळवारी एका हॉटेलमधून अटक करण्यात आली होती.

त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल ८० लाख जप्त केले होते. आता त्यांच्या शेतातून रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली पोती जप्त करण्यात आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते दीपांकर भट्टाचार्य यांच्याकडे कोट्यवधी रुपये सापडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दीपांकर भट्टाचार्य यांना पोलिसांनी आर्थिक गैरव्यवहार आणि अपहार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अटकेच्या दुसऱ्याच दिवशी, पोलिसांनी त्यांच्या घराजवळील एका शेतात पाच पोत्यांमध्ये लपवून ठेवलेले पैसे जप्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतातून एकूण २.२४ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. छाप्यादरम्यान दीपांकर भट्टाचार्य यांच्या घरातून ८० लाख आणि सोनंही जप्त करण्यात आलं होतं. चौकशीदरम्यान भट्टाचार्य यांनी स्वतः पोलिसांना शेतात लपवून ठेवलेल्या पैशांची माहिती दिली, ज्याच्या आधारे पोलीस पथकाने परिसरात शोधमोहीम राबवली.
२.२४ कोटी जप्त

स्थानिक पोलीस आणि तपास अधिकाऱ्यांनी शेतात खोदकाम करून पाच पोती बाहेर काढली, जी नोटांनी गच्च भरलेली होती. आतापर्यंत एकूण २.२४ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याच्या वृत्ताला पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर बदुरिया आणि आसपासच्या परिसरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात नगरपालिका पातळीवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून हे प्रकरण त्याचेच एक उदाहरण आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. टीएमसीकडून अद्याप या प्रकरणावर कोणतीही सविस्तर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.