Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुंतवणुकीचा नवा ट्रेंड: बाजारात पहिल्यांदाच आले 'तांब्याचे बार', सर्वसामान्यांसाठी ५०० रुपयांपासून खरेदीची उत्तम संधी!

गुंतवणुकीचा नवा ट्रेंड: बाजारात पहिल्यांदाच आले 'तांब्याचे बार', सर्वसामान्यांसाठी ५०० रुपयांपासून खरेदीची उत्तम संधी!


छत्रपती संभाजीनगर : पुढील वर्षभर सोने-चांदीची खरेदी कमी करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले. त्याचा परिणाम बाजारपेठेत या मौल्यवान धातूच्या विक्रीवर दिसून आला. सोन्या- चांदीच्या महागड्या गुंतवणुकीला पर्याय म्हणून आता सर्वसामान्यांसाठी 'तांब्याच्या बार'मध्ये गुंतवणुकीचा नवा मार्ग खुला झाला आहे. कमी भांडवलात दीर्घकालीन फायद्याचा विचार करणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांसाठी 'तांब्याचे बार' आता पहिल्यांदाच शहरातील भांडी बाजारात आले आहेत.

तांब्याच्या विटा का आल्या बाजारात?

एरव्ही हंगामात तांब्याचे भाव किलोमागे ५० ते १०० रुपयांपर्यंत वाढत व त्यानंतर मंदीही येत असे. मात्र, गेल्या दोन महिन्यांत तांबे १ हजार ते १,१०० रुपयांवरून वधारून २ हजार रुपये किलोने मिळत आहे. परिणामी, पूर्वी औद्योगिक वापरापुरते मर्यादित असलेले तांबे आता गुंतवणुकीचा पर्याय बनत आहे. यामुळे बाजारात १०० ग्रॅम, ५०० ग्रॅम व १ हजार ग्रॅम वजनाचे तांब्याचे बार विक्रीला येऊ लागले आहेत.

भविष्यातील सोने म्हणजे तांबे
सध्या इलेक्ट्रिक वाहन, सौर ऊर्जा आणि डेटा सेंटर उद्योगामुळे तांब्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तांब्याला 'भविष्यातील सोने' असेही म्हटले जात आहे. काही गुंतवणूकदार तांब्याचे बार किंवा वीट स्वरूपात साठवणूक करून दीर्घकालीन गुंतवणूक करीत आहेत.
तांबे करावे लागते आयातही

देशात राजस्थान, झारखंड आणि मध्य प्रदेशात तांबे उत्पादन होते. मात्र, वाढती औद्योगिक मागणी लक्षात घेता. चिली, ऑस्ट्रेलिया आणि पेरूसारख्या देशातून मोठ्या प्रमाणात तांब्याची आयात केली जात आहे.

गुंतवणुकीचा नवा प्रकार
शहरात तांब्याचे बार विक्रीला आले आहेत. यात १ किलो वजनाच्या विटा विकल्या जात आहेत. काही दुकानदारांनी १५ ते २० पेक्षा अधिक विटा घेऊन ठेवल्या आहेत. एका दुकानदाराने मागील महिन्यात एक किलो वजनाच्या ३० विटा विकल्या. बाजारात '९९९' शुद्धतेचे तांब्याचे बार उपलब्ध आहेत. ज्यामुळे गुंतवणूकदारांना शुद्धतेची खात्री मिळते.
-अक्षद जैन, व्यापारी
शुद्धतेची खात्री आवश्यक

गुंतवणूक करताना तांब्याच्या बारवर असलेल्या शुद्धतेच्या स्टॅम्पची आणि विश्वासार्ह व्यापाऱ्याची खात्री करावी. आज हे बार खरेदी केले आणि उद्या विक्री केले, तर मोडमध्ये त्याचा भाव ६०० रुपयांनी कमीच येणार आहे. मात्र, दीर्घकालीन व स्वस्तातील गुंतवणूक असल्याने त्याचा फायदा वर्षभरानंतर होईल. कारण, आता औद्योगिक मागणीमुळे तांब्याचे भाव वाढतच जातील.
-अभय शहा, आर्थिक नियोजक

तांब्याच्या बारचे भाव
वजन ---------- किमती
१०० ग्रॅम--- ५०० रुपये
५०० ग्रॅम--- १,५०० रुपये
१,००० ग्रॅम--- २,००० रुपये

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.