इस्लामपुरात वृद्ध दुकानदाराला लुटणारी आंतरराज्य इराणी टोळी जेरबंद; सांगली एलसीबीची धडक कारवाई, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
इस्लामपूर (ईश्वरपूर) येथील एका ७८ वर्षीय वृद्ध किराणा दुकानदाराचे वय आणि त्यांच्या कमी ऐकू येण्याच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन गळ्यातील सोन्याची चैन आणि अंगठी लंपास करणाऱ्या आंतरराज्य इराणी टोळीच्या सराईत गुन्हेगाराला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि सोन्याच्या दागिन्यांसह एकूण ३ लाख २० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
इक्बाल हिम्मतलाल बेग (वय ५९, रा. कुडची, ता. रायबाग, जि. बेळगाव, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यातील त्याचा साथीदार हैदर नजरू इराणी हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास इस्लामपूर येथील शिवाजी चौक, उरुण चावडीसमोरील 'प्रेरणा किराणा स्टोअर्स'चे मालक आनंदा महादेव वडगावकर (वय ७८) हे आपल्या दुकानाच्या बाहेर टपरीजवळ थांबले होते. दरम्यान, मोटारसायकलवरून आलेल्या ३५ ते ४० वयोगटातील दोन अनोळखी व्यक्तींनी वडगावकर यांच्याकडे तंबाखू-गुटखा आहे का, अशी विचारणा केली. वडगावकर यांचे वय जास्त असल्याने आणि त्यांना कमी ऐकू येत असल्याचा फायदा उठवून, या भामट्यांनी अत्यंत शिताफीने त्यांच्या गळ्यातील ११.५ ग्रॅमची सोन्याची चैन आणि उजव्या हाताच्या करंगळीतील ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी चोरली आणि तेथून पसार झाले. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सांगलवाडी परिसरात फिल्मी स्टाईलने आवळल्या आवळल्या मुसक्या
सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी मालमत्तेविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांवर आणि आंतरराज्य टोळ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत होते.
दरम्यान, एलसीबीचे पोलीस अंमलदार सागर लवटे आणि अरुण पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, जुना टोल नाका सांगलवाडी ते बायपास रोड परिसरात कर्नाटक पासिंगच्या काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून एक रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरत आहे. पथकाने तात्काळ या परिसरात सापळा रचला. संशयित इसम दिसताच पोलिसांनी त्याला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
सोन्याची चैन: ११.५ ग्रॅम (किंमत रु. १,६५,०००/-)सोन्याची अंगठी: ५ ग्रॅम (किंमत रु. ७५,०००/-)युनीकॉर्न मोटरसायकल: (किंमत रु. ८०,०००/-)रोख रक्कम: रु. ३००/-एकूण जप्त ऐवज: रु. ३,२०,३००/-पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपी इक्बाल बेग याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या डाव्या खिशात सोन्याची चैन, अंगठी आणि उजव्या खिशात नगदी रोकड आढळून आली. या दागिन्यांबाबत कसून चौकशी केली असता, त्याने तीन महिन्यांपूर्वी इस्लामपूर येथून आपला मित्र हैदर नजरू इराणी याच्यासह मिळून ही चोरी केल्याची कबुली दिली. सदर आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक मालमत्तेचे गुन्हे दाखल आहेत. एलसीबीने पुढील तपासासाठी आरोपी आणि जप्त मुद्देमाल इस्लामपूर पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि राजेंद्र यादव, पोलीस अंमलदार सागर लवटे, अरुण पाटील, संदीप गुरव, उदय माळी, सागर टिंगरे, अनिल कोळेकर, नागेश खरात, सतिश माने, अमिर फकीर, संदीप नलावडे, दरीबा बंडगर, मोतीराम खोत, सुरज थोरात, विक्रम खोत तसेच सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे व विजय पाटणकर यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.