Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माण-खटावमध्ये 'गोरे' विरुद्ध 'गोरे' पेटणार? उमेदवारीनंतर भावाचा संताप; थेट फडणवीसांकडेच मांडली खदखद!

माण-खटावमध्ये 'गोरे' विरुद्ध 'गोरे' पेटणार? उमेदवारीनंतर भावाचा संताप; थेट फडणवीसांकडेच मांडली खदखद!


सातारा : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. भारतीय जनता पक्षाकडून धैर्यशील कदम यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या जागेसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे खटाव-माणचे नेते शेखर गोरे कमालीचे नाराज झाले आहेत.

आपली हीच तीव्र खंत आणि नाराजी त्यांनी थेट राज्याचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पत्र लिहून सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली आहे. गोरे यांची ही अत्यंत भावनिक पोस्ट सध्या सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड वादळ निर्माण करत आहे.

साहेब मी नक्की कुठे चुकलो? शेखर गोरे यांचा फडणवीसांना सवाल
​या पत्रामध्ये त्यांनी 'साहेब मी नक्की कुठे चुकलो?' असा थेट आणि वेदनादायी सवाल उपस्थित केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी आणि नेतृत्वासाठी केलेल्या त्यागाची आठवण त्यांनी या पत्राद्वारे करून दिली आहे. प्रबळ दावेदारी असतानाही निवडणुकीचे तिकीट नाकारले गेल्याने कार्यकर्त्यांमध्येही नाराजी आहे.
शेखर गोरे यांनी पत्रात नक्की काय म्हटलंय?

"साहेब, मी नक्की कुठे चुकलो? आपल्या सांगण्यावरून गेल्या १३ वर्षांचा राजकीय संघर्ष संपवून, तुम्ही दिलेल्या जाहीर आश्वासनावर विश्वास ठेवून, तुमच्या भाजपच्या विधानसभेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देऊन प्रचंड बहुमतांनी निवडून आणले. माण-खटावमधून सर्वच निवडणुकीत माझ्या कार्यकर्त्यांना संधी न देता आपल्या उमेदवारांना ताकदीने निवडून आणण्याचे काम केले. याचे साक्षीदार माझ्या माण-खटावची जनता आहे. आपण शब्द पाळणारा नेता आहात हे ऐकून होतो, पण आज प्रत्यक्षात अनुभवले!" असे उद्विग्नपणे शेखर गोरे म्हणाले.

मंत्री जयकुमार गोरे आणि शेखर गोरे हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि विरोधक.. दोघे एकमेकांच्या विरोधात विधानसभा निवडणूकही लढले. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरे भावांमध्ये समझोता घडवून आणला. एकाला मंत्री आणि दुसऱ्याला आमदार करू, असा शब्द फडणवीस यांनी दिला होता. जयकुमार गोरे यांना मंत्री केले खरे पण शेखर गोरे यांना आमदार करण्याचे राहिले. आमदारकीचा शब्द फडणवीस यांनी पूर्ण केला नाही, हेच शेखर गोरे यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.
​शेखर गोरे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांमुळे भाजपच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता होणाऱ्या निवडणुकीत शेखर गोरे नेमकी काय भूमिका घेणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.