सांगली दर्पण Exclusive! पुण्यात ठिणगी पडली म्हणून सांगलीत कारवाईचा धुरळा! उत्पादन शुल्क विभागाला आताच कशी जाग आली? वाचा... या 'थेट ॲक्शन'मागचं खरं गौडबंगाल!
पुणे दुर्घटनेनंतर सांगलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अचानक 'मोठा हतोडा'; पण... २९ दिवस झोपलेले अधिकारी आताच कसे जागे झाले? प्रशासनाच्या 'टायमिंग'वर 'सांगली दर्पण'चा थेट सवाल!
सांगली: पुण्यातील भीषण दारू दुर्घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली असतानाच, सांगलीतही राज्य उत्पादन शुल्क विभागाने अचानक अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर 'मोठा हतोडा' फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या ३ दिवसांत तब्बल ४१ गुन्हे दाखल करून २९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. वरकरणी ही कारवाई अत्यंत मोठी आणि कौतुकास्पद वाटत असली, तरी या घाईघाईने केलेल्या कारवाईमुळे प्रशासनाच्या प्रामाणिकतेवर आणि हेतूवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुण्यात दुर्घटना झाली म्हणून आताच ३ दिवसांत इतके गुन्हे दाखल करून कोणता मोठा तीर मारला? असा संतप्त सवाल सांगलीकर विचारत आहेत.
विशेष म्हणजे, सांगली जिल्ह्यातील अवैध दारू धंद्यांबाबत आणि प्रशासनाच्या सुस्त कारभारावर **'सांगली दर्पण'**ने सलग २९ दिवस सातत्याने बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. जिल्ह्यातील कुठे-कुठे अवैध दारूचे अड्डे चालतात, याचे पुरावे समोर आणले होते. मात्र, तब्बल महिनाभर या बातम्यांची साधी दखल घेण्याची तसदीही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. तेव्हा अधिकारी कोणत्या 'अर्थपूर्ण' तडजोडीत व्यस्त होते? असा थेट आरोप आता नागरिक करत आहेत.
आताच कारवाईचे 'गौडबंगाल' काय?
महिनाभर हातावर हात धरून बसलेल्या प्रशासनाला अचानक ३ दिवसांत ४१ गुन्हे दाखल करण्याचे 'दिव्यज्ञान' कुठून प्राप्त झाले? पुण्यात दुर्घटना घडली आणि वरून आदेश आले, म्हणून केवळ आपली खुर्ची वाचवण्यासाठी आणि कागदोपत्री आकडा दाखवण्यासाठी ही धरपकड सुरू आहे का? जर हीच तत्परता आधी दाखवली असती, तर सांगली जिल्हा कधीच अवैध दारूमुक्त झाला असता. पण आधी डोळे मिटून बसायचे आणि दुर्घटना घडल्यावर कारवाईचा आव आणायचा, या प्रशासकीय 'गौडबंगाला'ची आता सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
जनतेच्या डोळ्यात धूळफेक नको, कायमस्वरूपी कारवाई करा!
केवळ वरच्या अधिकाऱ्यांचा दबाव आणि माध्यमांचा रोख बदलण्यासाठी केलेली ही ३ दिवसांची कारवाई म्हणजे निव्वळ 'स्टंटबाजी' आहे, अशी चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे. पुणे दुर्घटनेचे गांभीर्य ओसरल्यावर हे अधिकारी पुन्हा 'जैसे थे' मोडमध्ये जाणार नाहीत कशावरून? 'सांगली दर्पण' प्रशासनाला इशारा देत आहे की, केवळ आकड्यांचा खेळ करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करू नका. जिल्ह्यातील प्रत्येक अवैध दारूचा अड्डा कायमचा उद्ध्वस्त होईपर्यंत ही मोहीम अशीच प्रामाणिकपणे सुरू राहिली पाहिजे, अन्यथा प्रशासनाच्या या सोयीस्कर भूमिकेचे वाभाडे काढणे सुरूच राहील!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.