Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हातात बेड्या, कमरेला दोर... तृणमूल काँग्रेस नेत्याची पोलिसांकडून धिंड; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण!

हातात बेड्या, कमरेला दोर... तृणमूल काँग्रेस नेत्याची पोलिसांकडून धिंड; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण!


पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. ५९ आमदारांनी बंड करत ममता बॅनर्जी यांना धक्का दिला. ५९ आमदारांच्या गटाला विधानसभेत मान्यता देखील मिळाली. त्यानंतर २० बंडखोर खासदारांनीही नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियात विलीन होण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत.

असं असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांना वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी त्यांची जाहीरपणे धिंड काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून राजकारण चांगलंच तापलं आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे नेते जहांगीर खान यांना नऊ दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी जहांगीर खान यांची त्यांच्याच बालेकिल्ल्यात अर्थात फाल्टा येथे आतापर्यंत तीनदा धिंड काढली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी संतप्त होऊन निदर्शने केली आहेत. बंगालमधील बदलत्या राजकीय परिस्थितीचे पडसाद सध्या रस्त्यांवरही उमटताना दिसत आहेत. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
आकाश सिंह

पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकारचा शपथविधी झाल्यानंतर चार दिवसांनी म्हणजे १३ मे रोजी पोलिसांनी आकाश सिंहला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी आकाश सिंहची केवळ बनियन व अंतर्वस्त्रावर व मुंडण केलेल्या स्थितीत धिंड काढली आहे. त्याला ‘उत्तर हावडाचा डॉन’ म्हणून ओळखलं जायचं. त्याच्यावर जवळपास २० गुन्हे दाखल असल्याचं सांगितलं जातं. यामध्ये खंडणी आणि खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

अभिजीत रॉय
उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील कांचरापाडा येथील टीएमसीचे स्थानिक युवा नेते अभिजीत रॉय यांना २८ मे रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अभिजीत रॉय यांची कमरेला दोर बांधून धिंड काढली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, अभिजीत रॉय यांच्यावर बिजपूर पोलीस ठाण्यात खंडणीसह आदी गुन्हे दाखल आहेत.
जहांगीर खान

टीएमसीचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या अतिशय जवळचे म्हणून ओळखले जाणारे जहांगीर खान हे विधानसभा निवडणुकीदरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याशी झालेल्या जाहीर वादामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. एवढंच नाही तर जहांगीर खान यांनी या वादादरम्यान स्वतःची तुलना ‘पुष्पा’शी अशी केली होती. मात्र, निवडणुकीत टीएमसीचा पराभव झाल्यानंतर जहांगीर खान अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर ८ जून रोजी भारत-नेपाळ सीमेवरून ‘स्पेशल टास्क फोर्स’ने जहांगीर खान यांना अटक केली. जहांगीर खान यांच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, अटकेनंतर पोलिसांनी जहांगीर खान यांची फल्टा येथे सार्वजनिकरीत्या तीनदा धिंड काढली. यातील एका व्हिडीओत ते कान धरून जनतेची माफी मागताना दिसून आले आहेत.

गुड्डू अन्सारी
उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील कामरहाटी येथील स्थानिक नेते आमदार मदन मित्रा यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे गुड्डू अन्सारी यांना ३१ मे रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची हातकड्या घालून धिंड काढण्यात आली. अन्सारी यांच्यावर विविध क्षेत्रांतील व्यवसायांमध्ये ‘सिंडिकेट’ चालवल्याचा आणि लोकांना धमकावल्याचा आरोप आहे.
शमीम अहमद

‘गब्बर’ या नावांनी ओळखला जाणारा आणि टीएमसीच्या (TMC) एका माजी मंत्र्याचा निकटवर्तीय मानला जाणारा शमीम अहमद हा शिबपूरमधील वॉर्ड क्रमांक ३६ चा अध्यक्ष आहे. त्याची पत्नी यापूर्वी याच वॉर्डमध्ये नगरसेविका होती. या टीएमसी नेत्याला पोलिसांनी दक्षिण हावडा येथील एका गजबजलेल्या बाजारातून कमरेला दोर बांधून धिंड काढत फिरवलं आहे.

शाहिन मोल्ला
टीएमसीच्या एका माजी मंत्र्याशी असलेल्या जवळकीमुळे दक्षिण हावडा भागात मोठा दबदबा असलेला शाहिन मोल्ला (उर्फ सनी) याला, कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी २३ मे रोजी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला कमरेला दोर बांधून त्याची धिंड काढली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.