भारतीय नौदलाने 'अग्निवीर' (Apprentice) पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध ट्रेड्समधील जागा भरल्या जाणार आहेत. एकूण रिक्त पदांची संख्या नौदलाच्या सेवा आवश्यकतेनुसार निश्चित केली जाईल. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 5 जून पासून सुरू होत असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 जून असणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता म्हणून उमेदवार किमान 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण असावा, तसेच संबंधित ट्रेडमध्ये एआयसीटीई (AICTE) मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 50% गुणांसह 3 वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. वयोमर्यादेचा विचार केला तर, एका बॅचसाठी उमेदवाराचा जन्म 1 डिसेंबर 2004 ते 31 मे 2009 दरम्यान आणि दुसऱ्या बॅचसाठी 1 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009 दरम्यान झालेला असावा. सामान्य आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 550 रुपये अधिक 18% जीएसटी असे निश्चित करण्यात आले आहे.
'अशी' होणार परीक्षा
निवड प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे आयएनईटी (INET - Indian Navy Entrance Test) ही संगणक आधारित परीक्षा असेल. ही परीक्षा 'INET 2/2026' या नावाने ऑगस्ट 2026 मध्ये तात्पुरती नियोजित आहे. परीक्षेचे स्वरूप 100 गुणांचे बहुपर्यायी प्रश्नांचे (MCQs) असेल, ज्यासाठी 1 तासाचा वेळ दिला जाईल. ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असेल आणि यामध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांची नकारात्मक गुणपद्धती (Negative Marking) लागू असेल. पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यात शारीरिक पात्रता चाचणी (PFT), लेखी परीक्षा आणि भरती वैद्यकीय तपासणीला सामोरे जावे लागेल. यानंतर अंतिम नावनोंदणीपूर्वी आयएनएस चिल्का (INS Chilka) येथे अंतिम वैद्यकीय तपासणी केली जाईल.
पगार आणि लाखोंचा फंड
अग्निपथ योजनेअंतर्गत (नौदल कायदा 1957 नुसार) निवड झालेल्या उमेदवारांचा सेवा कालावधी एकूण 4 वर्षांचा असेल. पहिल्या वर्षी उमेदवारांना दरमहा 30,000 रुपये वेतन मिळेल, जे चौथ्या वर्षापर्यंत वाढून दरमहा 40,000 रुपये होईल. सेवा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, उमेदवारांना 'सेवा निधी' पॅकेजअंतर्गत अंदाजे 10.04 लाख रुपयांचा कॉर्पस फंड दिला जाईल. विशेष म्हणजे, 4 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल आणि त्या आधारे जास्तीत जास्त 25% अग्निवीरांना भारतीय नौदलाच्या नियमित केडरमध्ये कायमस्वरूपी सामावून घेतले जाईल. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी joinindiannavy.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.