बंगळुरू : लोकसेवक स्वतः लाच मागत किंवा स्वीकारत नसला तरी अधीनस्त कर्मचारी अथवा तिसऱ्या व्यक्तीमार्फत लाचेची मागणी केल्यास किंवा लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यातील सिरुगुप्पा पोलिस ठाण्यात तक्रारदार रेशन दुकानातल्या मालाची अवैध वाहतूक करतो म्हणून त्याची दुचाकी व मोबाइल पोलिसांनी ठाण्यात जमा केले होते. ते सोडवण्यासाठी तक्रारदार पीएसआय के. रंगय्या यांना भेटले. तेव्हा त्यांनी वाहन व मोबाइल सोडायला कॉन्स्टेबलला सांगितले. नंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी ५ हजार मागितले. ही रक्कम वेगळ्याच पोलिसाने स्वीकारली. यात पीएसआय रंगय्या यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. जो कर्नाटक हायकोर्टाने रंगय्या यांनी स्वतः लाच मागितली नाही म्हणत रद्द केला.
सूचक वाक्येही लाचेचाच प्रयत्न
सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय रद्द करताना म्हटले की, तक्रारदाराला "या मुलांसाठी काहीतरी करा" किंवा "त्यांना खूश करा", अशा प्रकारची सूचक वा अप्रत्यक्ष मागणीदेखील लाच मिळविण्याचा प्रयत्न ठरू शकते. लाचेची प्रत्यक्ष देवाणघेवाण किंवा आरोपीकडे रक्कम सापडणे आवश्यक नसून, मागणी किंवा अनुचित लाभ मिळविण्याचा प्रयत्न हाच गुन्हा ठरू शकतो.वरिष्ठ अधिकारी स्वतः समोर न येता अधीनस्त कर्मचारी, मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत लाचेची मागणी करून लाच घेत असतील, तरी त्यांना कायद्याच्या कचाट्यातून सुटका मिळू शकत नाही. अन्यथा वरिष्ठ अधिकारी पडद्यामागे राहून भ्रष्टाचाराचे नेटवर्क चालवू शकतील आणि भ्रष्टाचारविरोधी कायद्यात धोकादायक पळवाट निर्माण होईल. स्वतःसाठी किंवा इतर कोणासाठी, थेट किंवा तिसऱ्या व्यक्तीमार्फत लाच मिळविणे व मिळविण्याचा प्रयत्न करणे, हे गुन्हे आहेत. - न्यायमूर्ती संजय करोल आणि एन. कोटिश्वर सिंह.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.