नाशिकमधील 'कॅप्टन' म्हणून चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची चर्चा राज्यभर सुरू असतानाच शिर्डी पोलिसांनी आणखी एका अशोक खरात नावाच्या भोंदूबाबावर कारवाई करत त्याला अटक केली आहे.आंतरजातीय प्रेमविवाह निर्विघ्न पार पडावा आणि विवाहानंतर नातेवाईकांनी केलेली कथित करणी दूर करावी,असे आमिष दाखवत या भोंदूने एका दाम्पत्याकडून तब्बल 51 हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सांगली जिल्ह्यातील अभिजित निकम यांचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र आंतरजातीय विवाहामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात,अशी भीती संबंधित तरुणीच्या मनात निर्माण करण्यात आली.याचाच फायदा घेत कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील अशोक खरात याने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत या जोडप्याशी संपर्क साधला.
विविध पूजा,धार्मिक विधी आणि अनुष्ठान करण्याचा सल्ला दिला अन्..
विवाहात अडथळे येतील,नवऱ्यावर संकट आहे, तसेच नातेवाईकांनी करणी केली असल्याचे सांगून अशोक खरात याने दाम्पत्याला घाबरवले.या कथित संकटांपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी विविध पूजा,धार्मिक विधी आणि अनुष्ठान करण्याचा सल्ला देत त्याने विश्वास संपादन केला.त्यानंतर गेल्या वर्षभरात पूजा-अर्चा आणि विशेष विधींच्या नावाखाली संबंधित दाम्पत्याकडून वेळोवेळी 51 हजार रुपये घेतल्याचे तपासात समोर आले आहे.दरम्यान,अमावास्येच्या दिवशी विशेष पूजाविधीसाठी अशोक खरात याने दाम्पत्याला बोलावले होते.याबाबतची माहिती शिर्डी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचला.घटनास्थळी धाड टाकत अशोक खरात याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले.याप्रकरणी त्याची साथीदार माया विठ्ठल कुसळकर हिलाही राहाता परिसरातून अटक करण्यात आली आहे.
अशोक खरात आणि माया कुसळकर यांच्याविरोधात गुन्हा
अभिजित निकम यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात अशोक खरात आणि माया कुसळकर यांच्याविरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज त्याला राहाता न्यायालय हजर करण्यात आले आहे.दरम्यान,अशोक खरात याने याच पद्धतीने आणखी किती नागरिकांची फसवणूक केली आहे,याचा तपास पोलीस करत आहेत. अंधश्रद्धा, करणी आणि दैवी शक्तींचे आमिष दाखवत आर्थिक लाभ मिळवणाऱ्या अशा प्रकारांवर पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.