नागपूर: शासकीय नोकरीसाठी अनेक तरुण प्रयत्न करीत असतात. पण, प्रत्येकालाच त्यात यश मिळेल असे नाही. यामुळे अनेकांना नैराश्यही येते. हल्ली स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या खूप अधिक आहे. त्यामुळे शासकीय नोकरीसाठी स्पर्धा वाढली आहे. परंतु, त्यांना यात यश मिळाले नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अशा उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने शासकीय संस्थेमध्ये नोकरी संधी मिळणार आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया.
येथे मिळणार नोकरी
राज्य सरकारकडून मेगाभरतीची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात मोठ्या संख्येने पदभरती होण्याची शक्यता आहे. यासाठी अनेक उमेदवार तयारीही करतात. परंतु, तुम्हाला आता कंत्राटी पद्धतीने नोकरी हवी असल्यास तुम्ही येथे अर्ज करू शकता. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखालील माजी सैनिकी मुला-मुलींचे वसतीगृह तसेच सैनिक विश्रामगृह, हिस्लॉप कॉलेज समोर सिव्हिल लाईन्स येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसतीगृह अधीक्षक, सहाय्यक वसतीगृह अधीक्षक, सहाय्यक वसतीगृह अधीक्षिका, चौकीदार, स्वयंपाकी, सफाई कामगार, माळी, चौकीदार, सफाई कामगार ही पदे कंत्राटी पद्धतीने मासिक मानधन तत्वावर भरण्यात येणार आहे. यासाठी किमान एक वर्षांचा अनुभव आवश्यक असणार आहे.
अर्जदारांसाठी आवश्यक सूचना
माजी सैनिक / माजी सैनिक विधवा, शारिरीकदृष्ट्या सक्षम, कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुक माजी सैनिक / माजी सैनिक विधवांनी सर्व कागदपत्रांसह (वैयक्तिक अर्ज, आधार कार्ड, रहिवासी दाखला, पी.पी.ओ., बँक पासबुक, डिस्चार्ज बुक आदी) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, प्रशासकीय इमारत क्रमांक. १, तिसरा माळा, सिव्हील लाईन, नागपूर येथे २६ जुनपर्यंत अर्ज सादर करावे. मुलाखतीची वेळ व दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. प्राप्त झालेल्या अर्जामध्ये माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच माजी सैनिक/माजी सैनिक विधवा उपलब्ध न झाल्यास सदर पदे इतर नागरिक उमेदवारामधुन भरण्यात येतील.अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांकावर ०७१२-२५६११३३/ ९४०३७८०५१५ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी, नागपूर यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.