मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्याने 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खासदार फुटल्याची बातमी समोर येताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर थेट 50 कोटी रुपयांचे 'खोके' घेतल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. राऊतांच्या या 50 कोटींच्या आरोपामुळे राजकीय वातावरण प्रचंड तापले असून सामान्य जनतेच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होत आहे की ज्या खासदारांवर कोट्यवधींचे आरोप होत आहेत, त्यांची अधिकृत आणि खरी संपत्ती नेमकी किती आहे?
भाऊसाहेब राजाराम वाकचौरे मालमत्ता
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्या शपथपत्रानुसार वाकचौरे आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता 9.8 रुपये (९ कोटी ७५ लाख रुपये) इतकी घोषित करण्यात आली आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे उत्पन्न: आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या आयकर विवरणपत्रानुसार (ITR) भाऊसाहेब वाकचौरे यांचे वार्षिक उत्पन्न 9 लाख 80 हजार 660 रुपये इतके नोंदवले गेले आहे. ते शासकीय सेवेतून निवृत्त अधिकारी आहेत. त्यांच्या पत्नी सरस्वती भाऊसाहेब वाकचौरे या देखील बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांच्या नावावर आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये तब्बल 35 लाख 35 हजार 980 रुपये इतके वार्षिक उत्पन्न दर्शवण्यात आले आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर अंदाजे 24.3 लाख रुपयांचे कर्ज किंवा दायित्वे देखील नोंदवलेली आहेत.
संजय दिना पाटील
संजय दिना पाटील यांनी सादर केलेल्या अधिकृत शपथपत्रानुसार संजय दिना पाटील 2 कोटी 30 लाख 10 हजार 574 रुपये किमतीची एकूण जंगम मालमत्ता आहे. बँकेत 2 लाख 63 हजार रुपयांची रोख रक्कम असून, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा यांसारख्या विविध बँकांमध्ये त्यांच्या मोठ्या प्रमाणावर मुदत ठेवी (FD) व बचत खात्यात रक्कम जमा आहे.2023- 24 च्या आयकर विवरणपत्रानुसार त्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न 18 लाख 6 हजार 400 रुपये इतके आहे कुटुंबातील सदस्यांच्या नावेही मोठी जंगम मालमत्ता नोंदवण्यात आली आहे . त्यांच्या पत्नीच्या नावे 42 लाख 50 हजार 639 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये सोने आहे. एका मुलीच्या नावावर 52 लाख 89 हजार 614 रुपयांची मालमत्ता असून तर दुसऱ्या मुलीच्या नावावर 55 लाख 60 हजार 316 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
ओमराजे निंबाळकर
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निवडणूक शपथपत्रात कोट्यवधींच्या मालमत्तेची माहिती जाहीर केली आहे. शपथपत्रानुसार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून सुमारे 5 कोटी 58 लाख रुपयांची मालमत्ता आहे. निंबाळकर यांच्या नावावर 1 कोटी 70 लाख 33 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर स्थावर मालमत्तेमध्ये स्वतः संपादित मालमत्तेचे सध्याचे बाजारमूल्य 1 कोटी 44 लाख 83 हजार रुपये आणि वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेचे मूल्य 2 कोटी 43 लाख 43 हजार रुपये इतके आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या पत्नीच्या नावावरही मोठी मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नींकडे 50 लाख 55 हजार रुपयांची जंगम मालमत्ता असून स्थावर मालमत्तेचे एकूण मूल्य 1 कोटी 41 लाख 53 हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. कर्जाच्या बाबतीत ओमराजे निंबाळकर यांच्यावर 2 लाख 50 हजार 709 रुपयांचे कर्ज असल्याची नोंद शपथपत्रात आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर केवळ 1 हजार रुपयांचे कर्ज दाखवण्यात आले आहे. शासकीय देणी मात्र नसल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असून त्यातील मोठा हिस्सा वारसाहक्काने मिळालेल्या स्थावर मालमत्तेचा आहे. शपथपत्रातील आकडेवारीनुसार त्यांची एकूण मालमत्ता सुमारे 5.58 कोटी रुपये, तर पत्नीसह कुटुंबाची एकत्रित मालमत्ता 7.50 कोटी रुपयांहून अधिक आहे.
नागेश आष्टीकर
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश (बाबुराव) आष्टीकर यांच्या नावावर 5.29 कोटीची मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावरही सुमारे 1.20 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. आष्टीकर यांच्या मालमत्तेमध्ये शेती जमीन, निवासी आणि व्यावसायिक इमारतींचा समावेश आहे. हदगाव आणि नांदेड परिसरात त्यांच्याकडे विविध मालमत्ता असून काही मालमत्तांचे बाजारमूल्य लाखो रुपयांमध्ये आहे. शपथपत्रात वाहनांचीही नोंद असून फोर्ड एंडेव्हर, टाटा वाहन तसेच दुचाकींचा समावेश आहे. सोने-चांदीच्या बाबतीतही आष्टीकर कुटुंबाकडे लक्षणीय गुंतवणूक आहे. शपथपत्रानुसार नागेश आष्टीकर यांच्या नावावर सुमारे 500 ग्रॅम सोने असून त्याचे मूल्य अंदाजे 30 लाख रुपये आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 2000 ग्रॅम सोने असून त्याची किंमत सुमारे 60 लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मालमत्तेबरोबरच काही बँक आणि वित्तीय संस्थांची कर्जेही शपथपत्रात नमूद करण्यात आली आहेत. त्यामुळे कोट्यवधींची मालमत्ता असतानाच कर्जाची जबाबदारीही आष्टीकर यांच्यावर असल्याचे या शपथपत्रातून स्पष्ट होते.
संजय जाधव
आमदार संजय (बंडू) हरिभाऊ जाधव यांनी निवडणूक शपथपत्रात कोट्यवधींच्या मालमत्तेची नोंद केली आहे. शपथपत्रानुसार संजय जाधव यांची एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून सुमारे 6 कोटी 18 लाख रुपये इतकी आहे. जाधव यांच्या नावावर 1 कोटी 92 लाख 57 हजार 173 रुपयांची जंगम मालमत्ता असून 4 कोटी 25 लाख 34 हजार 866 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. स्थावर मालमत्तेमध्ये शेती जमीन, बिगरशेती जमीन आणि वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेचा समावेश आहे. मात्र मालमत्तेसोबतच त्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात कर्जही आहे. शपथपत्रानुसार संजय जाधव यांच्यावर 3 कोटी 39 लाख 50 हजार 691 रुपयांचे कर्ज आहे. तर त्यांच्या पत्नी क्रांती जाधव यांच्या नावावर सुमारे 4 कोटी 9 लाख रुपयांची मालमत्ता आणि 1 कोटी 35 लाख रुपयांहून अधिक कर्ज असल्याची नोंद शपथपत्रात करण्यात आली आहे.
संजय देशमुख
संजय देशमुख यांच्याकडे तीन लाख 75 हजार 550 रुपये रोख आहेत. चलसंपत्ती 18 कोटी 50 लाख 9 हजार तर, स्थावर संपत्ती 17 कोटी 9 लाख 82 हजार 768 एवढी आहे. याशिवाय 490 ग्रॅम सोने आहे. देशमुखांकडे दुचाकी आहे. मात्र स्वत:चे चारचाकी वाहन नाही. त्यांच्यावर 2 कोटी 91 लाख 91 हजार 359 रुपयांचे कर्ज आहे. देशमुख यांच्या उत्पन्नाचे स्रोत शेती, वेअर हाउसमधून येणारे उत्पन्न, व्यवसाय व माजी आमदार निवृत्तिवेतन आहे. संजय देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख वैशाली देशमुख यांच्याकडे सहा लाख 50 हजार रुपये रोख आहेत. याशिवाय स्कूल बस, दुचाकी, दोन चारचाकी वाहन, ट्रॅक्टर आदी वाहने आहेत. 447 ग्रॅम सोने व सहा किलो चांदी आहे. याशिवाय शेती व प्लॉट आदींचा समावेश आहे.50 कोटींच्या 'खोक्यां'च्या आरोपांनी महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. एका बाजूला संजय राऊत आक्रमकपणे 50 कोटींचे आरोप करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला बंडखोर खासदारांच्या प्रतिज्ञापत्रातील कोट्यवधी रुपयांची ही अधिकृत आकडेवारी आता जनतेसमोर आली आहे. त्यामुळे हा संपत्तीचा आणि आरोपांचा वाद आगामी काळात अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.