मिरज गँगवॉरने हादरले! भरचौकात रक्ताचा पूर; पूर्ववैमनस्यातून तरुणावर १३-१४ वार, पोलीस प्रशासन सुस्त, गुन्हेगार मस्त!
मिरज शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. भरदुपारी, गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने संपूर्ण मिरज शहर आणि परिसर थरारला आहे. "पोलीस प्रशासन सुस्त आणि गुन्हेगार मस्त" अशीच काहीशी भयानक परिस्थिती सध्या मिरजेत पाहायला मिळत असून, "सामान्य नागरिक सुरक्षित कधी होणार?" असा संतप्त सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मिरज-टाकळी रोडवर भरदुपारी ही थरारक घटना घडली. शिव अथनिकर असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. हल्लेखोरांनी शिव याला त्याच्या घराबाहेरच गाठले आणि काही समजण्याच्या आतच त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वासनांधतेने सपासप वार करण्यास सुरुवात केली.हल्लेखोरांनी शिववर तब्बल १३ ते १४ वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, टाकळी रोडवरील मुख्य रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता आणि क्षणार्धात तेथे रक्ताचा पूर वाहिल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. भरचौकात झालेल्या या रक्तरंजित थरारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण पसरले आहे. भरदुपारी मुख्य रस्त्यावर झालेल्या या गँगवॉरसदृश हल्ल्यामुळे मिरजकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाही धाक उरलेला नाही, हेच या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्यासह डी. बी. (गुन्हे शोध) पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिव अथनिकर याला पोलिसांनी तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
"हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असावा, असा आमचा प्रथमदर्शनी अंदाज आहे. जखमी शिव अथनिकर याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली असून, आरोपींना लवकरच बेड्या ठोकल्या जातील."
— किरण चौगुले, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस स्टेशन
मिरजकर सुरक्षित कधी? जनतेचा संतप्त सवाल
मिरजेत दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत चालली आहे. भरचौकात, लोकांसमोर आणि घराबाहेर गाठून जर असे जीवघेणे हल्ले होणार असतील, तर सामान्य जनतेने जगायचे कसे? हा मुख्य रस्त्यावरील थरार पोलिसांच्या सुस्त कारभारावर बोट ठेवणारा आहे. आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि हल्लेखोर पोलिसांच्या हाती कधी लागतात आणि मिरज पोलीस या गुंडांना कधी सरळ करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.