"भांडी घासूनही बायको छळायची!"... मृत्यूच्या दारात उभं राहून तरुणाने व्यक्त केलं दु:ख; व्हिडिओ व्हायरल!
फरीदाबाद येथे रविवारी एका २८ वर्षीय व्यावसायिकाने आपल्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केली. हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता.
त्यात त्याने आपली पत्नी आणि तिच्या कुटुंबावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे .पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून व्हिडिओमध्ये केलेल्या आरोपांचीही चौकशी केली जात आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
इन्स्टाग्रामवरील VIDEO मध्ये काय दावा केला?
मृत्यूपूर्वी पोस्ट केलेल्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये, राहुलने त्याची पत्नी ज्योती, सासू वीणा, सासरे बिट्टू आणि पत्नीची बहीण नीतू यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला. झाडू मारणे आणि भांडी घासण्यासह घरातील सर्व कामे करूनही आपल्याला मारहाण केली जायची आणि आपल्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असा दावा त्याने केला. आपण सतत मानसिक तणावाखाली जगत असल्याचं त्याने सांगितलं. राहुलने व्हिडिओमध्ये पुढे म्हटलं आहे की, त्याच्या मृत्यूला त्याची पत्नी आणि तिचे कुटुंब जबाबदार असून त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. तसंच त्याच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता त्याची आई, बहीण आणि भावांना मिळावी, असंही त्याने नमूद केलं. मृत राहुलने सुमारे चार महिन्यांपूर्वी कपड्यांचे दुकान सुरू केलं होतं.
पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल रविवारी सकाळी दुकानात जाण्यापूर्वी घरी आपल्या आईला भेटला होता. त्यानंतर काही वेळातच त्याने दुकानात गळफास लावून घेतला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. राहुलच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याने ज्योती नावाच्या महिलेशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर त्याच्या पत्नीला त्याने आपल्या आई-वडिलांसोबत राहिलेले मान्य नव्हते, त्यामुळे तो वेगळा राहू लागला, असा आरोप त्यांनी केला. राहुलने अलीकडेच आपले नवीन कपड्यांचे दुकान सुरू केले होते, असंही त्यांनी सांगितलं.
अमित नावाच्या एका नातेवाईकाने आरोप केला की, 'पत्नी आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळामुळे राहुल प्रचंड मानसिक तणावाखाली होता. राहुलच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता, यामुळे त्याचा तणाव आणखी वाढला.' राहुलला त्याच्या आई-वडिलांनाही भेटू दिले जात नव्हते, असा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.
तपास अधिकारी संजय कुमार यांनी सांगितलं की, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ तपासात समाविष्ट करण्यात आला असून, त्यामध्ये करण्यात आलेल्या आरोपांची चौकशीदरम्यान पडताळणी केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.