नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन
हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. बागलान तालुक्यातील आखतवाडे गावामध्ये मटणाचं जेवण एका शेतकरी दाम्पत्याच्या चांगलंच जीवावर बेतलं आहे.
रविवारी रात्री मटणाचं जेवण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे संपूर्ण आखतवाडे गावावर आणि नाशिक परिसरात शोककळा पसरली आहे. तर दुसरीकडे 78 वर्षीय शांताराम ह्याळीज यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
नेमकी विषबाधा कशामुळे?
या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नेमकी विषबाधा मटणामुळे झाली की दह्यामुळे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अनेकदा मटण आणि दही एकत्र खाल्ल्याने किंवा अन्न शिळे असल्यास फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो. मात्र, या प्रकरणातील नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही.
अन्नाचे नमुने पुण्यात पाठवले
घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक प्रशासनानं आणि पोलिसांनी तात्काळ पावलं उचलली आहेत. या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी आणि मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्या रात्रीच्या अन्नाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. हे सर्व नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.