अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने अल्बामा येथे उभारलेल्या यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटरमधील नासाच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी (नासा ट्रेनिंग प्रोग्राम) महाराष्ट्रात घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा सप्टेंबर २०२६ मध्ये होणार आहे. भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणार आहे. इयत्ता सहावी ते बारावीच्या मुलांना ही परीक्षा देता येणार असून,
या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत २९ जुन ते ३१ ऑगस्ट अशी देण्यात आली आहे. स्वान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सचिव विकास टाकळीकर, कोषाध्यक्ष अक्षय खोब्रागडे, सहसचिव गौरव सोमवंशी,प्रसाद भोपळे, अमन पाचघरे, संकेत जैन आदी उपस्थित होते. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल. प्रामुख्याने गणित, विज्ञान, भूगोल, बुद्धिमापन यावर आधारित प्रश्नपत्रिका असेल.
यामुळे विद्यार्थी चाकोरीबाहेर जाऊन विषयांचा अभ्यास करणार आहेत. शिवाय अंतराळविषयक संशोधन, प्रात्यक्षिके यांचा अभ्यास त्यांना विद्यार्थीदशेत करायला मिळणार असून आगामी पिढीसाठी हे महत्वाचे आहे, असे शशिकांत कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रातील इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमातील शाळांसह जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांचाही समावेश आहे.
या परीक्षेतून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये युएस स्पेस अँड रॉकेट सेंटर, हन्टस्वीले, अल्बामा आणि सिंगापूर सायन्स येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी नेण्यात येईल. अमेरिकेतील स्पेस कॅम्प, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, ऑरलॅन्डो या ठिकाणीही विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यात येणार आहे, असे विकास टाकळीकर यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी https://swanrsfoundation.com/swan या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन स्वान रिसर्च फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.