Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बनावट प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश! उपजिल्हाधिकारी सांगळेंसह महसूल अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले; मुंबईत गुन्हा नोंद

बनावट प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश! उपजिल्हाधिकारी सांगळेंसह महसूल अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले; मुंबईत गुन्हा नोंद


मुंबई: पद, अधिकार तसेच कनिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करीत मुंबईत बनावट दाखले वितरित केल्याचा प्रकार समोर आल्याने, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार अधिकाऱ्यांच्या चौकशी पथकाद्वारे तपासणी करून पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी मुंबई शहर सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे आणि महसूल सहायक नागनाथ लोलेवार यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर व्याप्ती लक्षात घेऊन तपासणी जारी राहणार असल्याने चौकशी पथक कायम राहील, असे बावनकुळे यांनी सांगितले. मुंबई शहर जिल्ह्यातील एफ/साऊथ आणि एफ/नॉर्थ विभागाचे तहसीलदार संदीप आवारी हे ८ मे २०२६ पासून रजेवर गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत या पदाचा अतिरिक्त कार्यभार तहसीलदार संकेत यमगर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. या संधीचा फायदा घेत उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांनी नायब तहसीलदार दीपाली कुलकर्णी यांना त्यांची डिजिटल स्वाक्षरी बनविण्याचे तोंडी आदेश दिले. त्यानुसार कुलकर्णी यांनी स्वाक्षरी बनवून सांगळे यांच्याकडे सुपुर्द केली हाेती.

संशयास्पद कारभाराचा सुगावा
संशयास्पद कारभाराचा सुगावा लागताच चार तपास पथके नेमून वितरित प्रमाणपत्रांची तपासणी सुरू झाली. निम्मी प्रमाणपत्रे तपासून झाल्यावर पोलिसात तक्रार करण्याचे आदेश दिले गेले. कार्यकारी दंडाधिकारी धैर्यशील जाधव यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, महिनाभरात २,०३९ प्रमाणपत्रे वितरित झाली. त्यापैकी निम्मी म्हणजे १,०२३ तपासण्यात आली. त्यातील २२१ प्रमाणपत्रे बनावट असल्याचे दिसून आले. ही प्रमाणपत्रे आवश्यक कागदपत्रांची किंवा पुराव्यांची पूर्तता नसताना, बेकायदेशीर आणि त्रुटीयुक्त पद्धतीने जारी करण्यात आली. उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे आणि नागनाथ लोलेवार यांच्याविरुद्ध कलम ३१९(२), ३३५, ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलमांअन्वये गुन्हा दाखल केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.