पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे औंध रोड येथील एका नामांकित बँकेची १ कोटी १७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. चार कोटी रुपयांची एफडी करण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी, चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बँकेच्या वतीने निशीथ मूलचंद गौतम (वय ४४, रा. औंध) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३० मार्च रोजी घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौतम हे औंध येथील पंजाब नॅशनल बँकेत मुख्य व्यवस्थापक आहेत.
त्यांच्या अगोदर अंजना सिंग या मुख्य व्यवस्थापक म्हणून काम पाहत होत्या. आरोपीने सिंग यांना फोन करून, 'तुमच्या बँकेत चार कोटी रुपयांची एफडी करायची आहे. त्यासाठी किती व्याजदर मिळेल?' अशी विचारणा केली. त्यानंतर सिंग यांनी आरोपीला सर्व माहिती दिली. पुढे आरोपीने तो जमिनीचे व्यवहार करत असल्याचे सांगितले. तसेच, चेकबुक संपल्याने कंपनीच्या लेटरहेडवरून आरटीजीएस करता येईल का, अशी विचारणा केली.
यानंतर आरोपीने व्हॉट्सअपवर गायत्री प्रॉपर्टीज, प्रोजेक्शन स्टुडिओज आणि श्री डेव्हलपर्स यांच्या लेटरहेडवरून पाच बँक खात्यांमध्ये आरटीजीएस करण्यासंदर्भातील कागदपत्रे पाठवली. सिंग यांनी कागदपत्रांची पडताळणी केली. ती खरी असल्याचा विश्वास बसल्याने त्यांनी १ कोटी १७ लाख ६२ हजार रुपये संबंधित खात्यांमध्ये पाठवले.त्यानंतर आरोपीला फोन केला असता त्याचा फोन बंद लागला. त्यामुळे सिंग यांना संशय आला. यानंतर त्यांनी गायत्री प्रॉपर्टीज, प्रोजेक्शन स्टुडिओज आणि श्री डेव्हलपर्स यांच्या कागदपत्रांवरील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधला. त्यावेळी संबंधितांनी त्यांनी कोणताही फोन अथवा आरटीजीएस करण्यास सांगितले नसल्याचे स्पष्ट केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सिंग यांनी हा प्रकार बँकेच्या व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिला. त्यानुसार गौतम यांनी तक्रार देताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने संबंधित फर्मचे बनावट लेटर हेड तयार करून स्वतःत त्या व्यवसायाशी संबंधित व्यक्ती असल्याचे भासवून ही आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास चतुश्रृंगी पोलिस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.